Type Here to Get Search Results !

कृपया मत मागायला येवू नका, भंडाऱ्यात घरासमोर लागल्या पाट्या; काय आहे हा प्रकार?

मतदान न करण्याचा निर्धार म. टा. वृत्तसेवा, भंडारा : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे आरक्षण रद्द केल्याचा निर्णय दिल्याने २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या भंडारा-गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुका अडचणीत आल्या आहेत. या निर्णयामुळे ओबीसी समाजामध्ये संताप असून निवडणुका झाल्याच तर मतदान न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर 'कृपया मत मागायला येवू नका' अशा पाट्या आता ग्रामीण भागातील घरांवर लागलेल्या दिसतात. ओबीसींसाठी राखीव असलेल्या जागांची निवडणूक प्रक्रिया 'जैसे थे' ठेवून सर्वसाधारण व राखीव असलेल्या जागांसाठी मतदान घेण्यात येणार असल्याने निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपला जनसंपर्क वाढविण्यास सुरुवातही केली आहे. परंतु, ओबीसी राखीव असलेल्या क्षेत्रात सामसूम वातावरण आहे. आरक्षण पूर्ववत होईल की निवडणूक रद्द होईल, असे संभ्रमाचे वातावरण जिल्ह्यात आहे. तथापि, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेवू नये, अशी सर्वच राजकीय पक्षांची भूमिका आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकीकरिता दाखल करण्यात आलेले नामांकन सर्व राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांनी एकत्रित येऊन मागे घेण्यात यावे, असे आवाहन राजकीय पक्षांकडून होत आहे. परंतु, आरक्षण रद्द होईस्तोवर सर्वच राजकीय पक्ष मूग गिळून होते, ओबीसी आरक्षणासाठी कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न केले नाही. इतकेच नव्हे तर ओबीसी नेतेही गपगुमान होते, याचा संताप आता ओबीसी समाजात दिसून येत आहे. त्यामुळेच आरक्षण नाही तर मतदान नाही, अशी भूमिका ओबीसी समाजाने घेतली आहे. 'कृपया मत मागायला येवू नका' जिल्हा परिषद निवडणुकीत ओबीसी समाजाकडून मतदानावर बहिष्काराची भूमिका घेण्यात आली आहे. भंडारा तालुक्यातील पिपरी येथे घरांवर 'कृपया मत मागायला येवू नका, आमचा निवडणुकीवर बहिष्कार आहे, ओबीसींची जनगणना करा' अशा पाट्या लावण्यात आल्या आहेत. यातून ओबीसींचा आक्रोश दिसून येत आहे. राजकीय नेत्यांचा लागणार कस जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा पेच निर्माण झाला. भंडारा जिल्ह्यात ओबीसी समाजाची मोठी वोट बँक आहे. परंतु, त्यांचे आरक्षणच रद्द झाल्याने राजकीय पक्षाच्या नेत्यांपुढे पेच निर्माण झाला आहे. कोणत्या मुद्यावरून त्यांच्याकडे मतांचा जोगवा मागावा, हाच प्रश्न या राजकीय मंडळींना पडला आहे. निवडणुकीची रणनिती आखावी की ओबीसींचा रोष ओढावून घ्यायचा अशा द्विधामनस्थितीत राजकीय नेते आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3GAUbSh

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.