Type Here to Get Search Results !

कोल्हापुरात प्रचंड घबराट! गव्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, बरगड्यांना शिंग लागले आणि...

सतीश घाटगे । गव्याचा हल्ल्यात तालुक्यातील भुयेवाडी येथील तरुण ठार झाला आहे. सौरभ संभाजी खोत (वय २१, रा. भुयेवाडी) असे तरुणाचे नाव आहे. गव्याच्या हल्ल्यात इतर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. प्रल्हाद उर्फ लाला पाटील जखमी झाले आहेत. वनखात्यानेही या घटनेला दुजोरा दिला आहे. (Youth dies in Gava attack) मयत सौरभ हा माजी सरपंच पूजा खोत यांचा तर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संभाजी खोत यांचा एकुलता एक मुलगा आहे. गव्याचा वावर गेले तीन दिवस कोल्हापूर शहराच्या परिसरात आहे. गुरुवारी रात्री गवा लक्षतीर्थ वसाहतीत होता, तर काल शुक्रवारी पंचगंगा नदी परिसरात गव्याचा वावर होता. काल गव्याने दिवसभर जामदार क्लब येथील महादेव मंदिराच्या पिछाडीस गवताच्या रानात ठाण मांडले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास गवा परतला होता. शिवाजी पुलावरून तो वडणगेतील पवार पाणंदकडे गेला होता. त्यामुळे शहरवासीयांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. गवा पुन्हा नैसर्गिक अधिवासात जावा यासाठी वनखात्यासह वनप्रेमी संघटनेचे सदस्य प्रयत्नशील होते. वाचा: गवा भुयेवाडी, भुये परिसरात असल्याची माहिती पुढे येत होती. पण शनिवारी रात्री गव्याच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. भुयेवाडी शिवारातील घाण्याजवळ गव्याने सौरभ खोत याच्यावर हल्ला केला. सौरभच्या डाव्या बाजूच्या बरगडीला गव्याचे शिंग लागल्याने तो गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. प्रल्‍हाद पाटील याच्या मांडीला शिंग लागले व खांदा फ्रॅक्चर होऊन तो जखमी झाला आहे. शुभम पाटील हा घाबरून पळत असताना पडल्यानंतर त्याच्या अंगावर गव्याने पाय दिल्यानं तो जखमी झाला. वाचा: भुयेवाडी गाव शिवारा बाहेरून गवा हा पोहाळे मार्गे जोतिबा डोंगराचे दिशेने सावकाश गेला असून वनविभागाची रेस्क्यू टीम त्याचा पाठलाग करत आहे. जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या ग्रामस्थांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oKGEkX

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.