नागपूर : राज्याच्या समुद्र किनाऱ्याजवळील पूर्वमध्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील वातावरणात बदल घडणार आहेत. यामुळे राज्यातील थंडी परत एकदा गायब होणार असून ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भ व उपराजधानीतसुद्धा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लक्षद्वीप आणि दक्षिण पूर्व अरबी समुद्रात सध्या वादळी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याचा परिणाम दक्षिणेतील राज्ये, महाराष्ट्र आणि मध्य भारतावरसुद्धा होणार आहे. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३० नोव्हेंबरपासून पुढील तीन दिवसांत राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्र आणि तामिळनाडूच्या किनारपट्टी परिसरामध्ये हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. यामुळे कोकण व मुंबईसह राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्येसुद्धा अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात मंगळवारपासून आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच गुरुवार, २ व शुक्रवार, ३ डिसेंबरला काही ठिकाणी तुरळक पावसाचीही शक्यता आहे. यामुळे तापमानात ३ ते ४ अंशांची वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, पुढे ५ डिसेंबरपासून परत एकदा पाऱ्यात घसरण होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविला आहे. भारतीय हवामान विभागाकडून इशारा राज्यात आज, मंगळवारपासून दक्षिण व उत्तर कोकण, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे, तर बुधवारी मराठवाड्यातही पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत मंगळवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. कोकणात व उत्तर महाराष्ट्रात गुरुवारपर्यंत पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद येथे बुधवारी एक डिसेंबरला आणि औरंगाबाद, जालना, बीड येथे तुरळक ठिकाणी दोन डिसेंबरला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजा; तसेच जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lkglAf