Type Here to Get Search Results !

नागरिकांनो सावधान! चड्डी बनीयानवर आलेल्या चोरट्यांनी घरात सगळ्यांना उठवून चोरले दागिने, लाखोंचा ऐवज लंपास

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील शिक्षक कॉलनी भागात चड्डी बनियांनवर आलेल्या चोरट्यांनी एका शिक्षकाच्या घरात प्रवेश करून लाखोंचा ऐवज पळविला गुरुवारी ता. २५ पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये सुमारे पावने दोन लाख रुपये रोख रकमेचा समावेश आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाडा बाळापूर येथील शिक्षक कॉलनी भागात राजेश व्यवहारे यांचे घर आहे. राजेश व्यवहारे व त्यांच्या पत्नी दोघेही शिक्षक आहेत. बुधवारी ता. २४ रात्री व्यवहारे कुटुंब झोपले होते. दरम्यान, आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास चड्डी-बनियानवर असलेल्या तीन चोरट्यांनी घराच्या चैनल गेटचे दोन कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी कपाट फोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज ताब्यात घेतला. त्यानंतर व्यवहारे यांच्या पत्नीस चोरट्यांनी डोक्यात चापट मारून उठवले. समोर चोरटे दिसताच त्या ओरडल्या. यावेळी त्यांच्या मुलास जाग आली मात्र चोरट्यांनी त्यास ए तु मुकाट्याने झोप असे दरडावून सांगितले. त्यामुळे मुलानेही आरडाओरड केली नाही. यानंतर चोरट्यांनी व्यवहारे यांच्या पत्नीला अंगावरील सर्व दागिने काढून देण्यास सांगितले. मारहाणीच्या भीतीपोटी त्यांनीही अंगावरील सर्व दागिने काढून दिले. घरात आणखी कुठे काही आहे का आत्ताच सांगा अशा दरडावणीच्या सुरवातही चोरट्यांनी त्यांना विचारले. मात्र, आता घरात काहीच नाही असे त्यांनी सांगतात चोरट्यांनी घरातून काढता पाय घेतला. चोरटे घरातून गेल्याचे लक्षात आल्यानंतर राजेश व्यवहारे यांनी शेजाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तसेच आखाडाबाळापुर पोलिसांनाही माहिती देण्यात आली. आखाडा बाळापुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक बालाजी पुंड, जमादार नागोराव बाभळे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. आज पहाटे श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले मात्र पथकाने बोल्डा रोड मार्गापर्यंत चोरट्यांचा माग काढला. त्या नंतर श्वान पथक तिथेच घुटमळले. पोलिसांनी ठसे तज्ज्ञांना पाचारण केले असून घटनास्थळावरून चोरट्यांच्या हाताचे ठसे घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी आखाडाबाळापुर पोलीस ठाण्यात अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान या घटनेमध्ये सुमारे पावणेदोन लाख रुपयांची रोख रक्कम तसेच सुमारे २० ते २२ तोळे सोने असा लाखोंचा ऐवज चोरीला गेल्याचे सांगण्यात आले आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CLyuMZ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.