Type Here to Get Search Results !

अनिल देशमुखांच्या स्वीय सचिवाने माझ्याकडं पैसे मागितले नव्हते; सचिन वाझेची आयोगासमोर साक्ष

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई 'माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे यांनी माझ्याकडे स्वत:साठी पैशांची किंवा कमिशनची मागणी केली नाही किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी पैसे देण्याविषयी संदेश दिला नाही', अशी साक्ष बडतर्फ पोलिस अधिकारी याने निवृत्त न्यायमूर्ती के. यू. चांदिवाल चौकशी आयोगासमोर बुधवारी दिली. 'देशमुख यांनी सचिन वाझे व सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील अशा कनिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या ज्ञानेश्वरी निवासस्थानी बोलवून मुंबईतील बार अँड रेस्टॉरंट मालकांकडून व अन्य स्रोतांच्या माध्यमातून वसूल करत मासिक शंभर कोटी रुपयांचा निधी गोळा करण्याचे लक्ष्य दिले', असा गंभीर आरोप माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २० मार्च २०२१ रोजी पत्र पाठवून केला. या आरोपांमागील सत्य शोधण्यासाठी राज्य सरकारने हा चौकशी आयोग नेमला आहे. पलांडे यांच्यातर्फे अॅड. शेखर जगताप यांनी वाझेची उलटतपासणी केली. 'संजीव पलांडे यांच्याशी माझा वैयक्तिक परिचय किंवा मैत्री नव्हती. गृहमंत्र्यांचे स्वीय सचिव म्हणून त्यांना ओळखत होतो. माझ्याकडे ज्या गुन्ह्यांचा तपास होता किंवा गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर कक्षाचा (सीआययू) प्रमुख म्हणून ज्या गुन्ह्यांच्या तपासावर मी देखरेख करत होतो त्याबद्दल त्यांच्याशी अधिकृतरीत्या संवाद व्हायचा. फेब्रुवारीत मी पलांडे यांना ज्ञानेश्वरी बंगल्यात भेटलो. त्यांनी माझ्याकडे स्वत:साठी पैशांची किंवा कमिशनची मागणी केली नाही किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी पैसे देण्याविषयी संदेश दिला नाही', अशी माहिती वाझेने प्रश्नांच्या उत्तरात दिली. तत्पूर्वी याअनुषंगाने परमबीर यांच्या पत्रातील परिच्छेद सातचा संदर्भही वाझेला दाखवण्यात आला. 'आयोगासमोर यापूर्वी माझे प्रतिज्ञापत्र दाखल करताना परमबीर यांच्या पत्रातील तपशील मी वाचला होता', हे वाझेचे म्हणणेही न्या. चांदिवाल यांनी नोंदवून घेतले. 'देशमुख यांनी वाझेला अनेकदा ज्ञानेश्वरी बंगल्यावर बोलावले आणि पैसे जमा करण्यास सांगितले. फेब्रुवारीच्या मध्यावर व त्यानंतर देशमुख यांनी वाझेला बंगल्यावर बोलावले होते. त्यावेळी त्यांचे स्वीय सचिव पलांडे यांच्यासह अन्य एक दोन कर्मचारी उपस्थित होते', असे परमबीर यांच्या पत्रातील परिच्छेद सातमध्ये नमूद आहे. 'हॉटेल मालकांकडे पैशांची मागणी नाही' 'हॉटेल मालक महेश शेट्टी किंवा जया पुजारी किंवा मुंबईतील अन्य बार अँड रेस्टॉरंट मालकांना तुम्ही सीआययूच्या कार्यालयात बोलावले होते का? निर्धारित वेळेनंतरही हॉटेल सुरू राहू द्यायचे असल्यास पैसे द्यावे लागतील, असे म्हणत तुम्ही त्यांच्याकडे मागणी केली होती का?', या प्रश्नांवर उत्तर देताना वाझेने नकारार्थी उत्तर दिले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cIft3E

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.