Type Here to Get Search Results !

खळबळजनक! साताऱ्यातील 'या' मोदींना बाँम्बने उडवून देण्याची धमकी, इंटरनॅशनल कॉल आणि मेसेजने खळबळ

सातारा : सातार्‍यातील मिठाई व्यवसायिकाला गेल्या ८ दिवसांपासून इंटरनॅशनल कॉल येत असून ३० लाख रुपयांची खंडणीची मागणी केली जात आहे. या कॉल्समुळे सगळेच जण घाबरले असून पोलीसही या घटनेचा अधिक तपास करत असल्याची माहिती आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे पैसे न दिल्यास बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिस मुख्यालयात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. प्रशांत मोदी असे तक्रार अर्ज केलेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. गेल्या आठ दिवसापासून त्यांना इंटरनॅशनल कॉल येत आहेत. ३० लाख रुपये दे, अन्यथा बॉम्ब लावून उडवून देईन, अशी धमकी देण्यात आली. सुरुवातीला मोदी यांनी प्रकाराकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यांना रात्री-अपरात्री देखील फोन येण्याचे तसेच मेसेज करुन वारंवार ३० लाख रुपये देण्यासाठी धमकावले गेले. सुमारे १० ते १२ कॉल, मेसेज आल्याने मोदी यांनी पोलीस मुख्यालयात याबाबत ई मेलकरुन तक्रार अर्ज पाठवला. या तक्रार अर्जात आलेले फोन नंबर, मेसेज याचे स्क्रीन शॉट देखील जोडण्यात आले आहेत. येणार्‍या या धमकीमुळे त्यांच्या जिवीताला धोका निर्माण झाला आहे असं दिलेल्या तक्रारीत मोदी यांनी सांगितलं असुन दोन नंबरवरुन एकाच प्रकारची धमकी दिली जात असल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. सातारा पोलिसांना मेल पाठवल्यानंतर प्रशांत मोदी यांनी सायबर पोलीस ठाण्यात जावून घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. सातारा पोलिसांनी सर्व माहिती घेवून तपासाला सुरुवात केली असून सर्व अंगाने याचा तपास होत आहे. दरम्यान, सातार्‍यातील व्यवसायिकाला ३० लाख रुपयांसाठी ब्लॅकमेल केलं जात असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3HuMs9F

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.