Type Here to Get Search Results !

आबासाहेबांना श्रमिकांचा लाल सलाम! अखेर निरोप देण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी

सोलापूर : शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन झाल्याने राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे. आज त्यांचे पार्थिव सांगोला तालुक्‍यात येणार असल्याने पंढरपूर - सांगोला रस्त्यावर त्यांच्या अखेरच्या दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. आज शनिवारी सकाळी सोलापूरहून त्यांचं पार्थिव सांगोला तालुक्यात दर्शनासाठी येणार असल्याने नागरिकांची एकच गर्दी पाहायला मिळाली. इतकंच नाहीतर पंढरपूरवरून येणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात नागरिक उभे होते. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास सांगली तालुक्यात आबासाहेबांचं पार्थिव आले असता नागरिकांनी 'आबासाहेब अमर रहे' अशा घोषणाही दिल्या. खरंतर, गणपतराव देशमुख यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, काल सायंकाळी त्यांची प्रकृती अचानक ढासळली आणि रात्री ९ च्या सुमारास त्यांनी सोलापुरातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गणपतराव देशमुख हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून तब्बल ११ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. सर्वाधिक वेळा विधानसभेत निवडून जाणारे आमदार म्हणून देशमुख यांची ओळख होती. २००९च्या निवडणुकीत विजय मिळवून करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. एक पक्ष, एक मतदारसंघ आणि एकच नेता असा विश्वविक्रमी सांगोल्याचा वारसा आज हरपला आहे. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केलं आहे. देशमुख हे सांगोल्यात सर्वप्रथम १९६२ च्या निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर १९७२ आणि १९९५चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांनाच भरभरून मते दिली. २०१२ मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव केला होता. गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र १९७८ मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केले तेव्हा आणि १९९९ मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा, अशा दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. दरम्यान, माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यभरातून विविध नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी गणपतराव देशमुख यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rH5hz2

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.