Type Here to Get Search Results !

भाजपमध्ये मोठ्या हालचाली, ७७ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन राजेंद्र मस्के मुंबईत

मुंबई : केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात परळीच्या भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना जागा न मिळाल्यामुळे आक्रमक समर्थकांनी राजीनाम्याचा सत्र सुरू केलं आहे. पंकजा समर्थक आणि बीड भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे 77 पदाधिकार्‍यांचे राजीनामे घेऊन थेट मुंबईला रवाना झाले असल्याची माहिती समोर येत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या पंकजा मुंडे या बैठक घेत पदाधिकार्‍यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे या बैठकीत पंकजा मुंडे समर्थकांना काय सांगणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अधिक माहितीनुसार, मंगळवारी पंकजा मुंडे यांनी मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. वरळीतील कार्यालयात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी पंकजा मुंडे समर्थकांशी काय बोलणार? त्यांची समजूत काढण्यात पंकजा यांना यश येणार का? याबद्दल ता राजकीय चर्चा सुरू आहे. खरंतर आत्तापर्यंत भाजपच्या 50 हून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. अशात आता मस्के हे 77 पदाधिकार्‍यांचे राजीनामे घेऊन मुंबईला निघाले आहेत. त्यामुळे ही भाजपसाठी मोठी चिंतेची बाब आहे. यावर पंकजा मुंडे यांनी काल दिल्लीवारी केली. यावेळी त्यांनी भाजपच्या बड्या नेत्यांशी भेटीगाठी केल्या. त्यामुळे उद्याच्या बैठकीत त्या यावर काही माहिती देतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. बीडपाठोपाठ नगरमध्येही राजीनाम्याचं सत्र खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिपद न मिळाल्याने बीड जिल्ह्यात सुरू झालेल्या नाराज कार्यकर्त्यांच्या राजीनाम्याचे सत्र नगर जिल्ह्यातही पोहोचलं आहे. भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अंबादास ढाकणे यांनी राजीनामा देत पक्षाच्या भूमिकेला विरोध दर्शवला आहे. मुंडे समर्थकांची खदखद राज्यात २०१४ साली भाजप-शिवसेना युतीचं सरकार आल्यानंतर काही दिवसांनंतरच पक्षांतर्गत संघर्ष सुरू झाल्याची चर्चा होऊ लागली होती. पंकजा मुंडे यांना ग्रामविकास खातं तर मिळालं होतं. मात्र, नंतरच्या काळात पक्षनेतृत्वाकडून त्यांचे पंख छाटण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचं बोललं गेलं. तसंच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनाही पक्षाकडून विधानपरिषदेसाठी संधी देण्यात आली नाही. पंकजा मुंडे यांच्या जागी ओबीसी समाजातूनच येणाऱ्या रमेश कराड यांच्या नावाची अचानक घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारातही प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू असताना त्यांच्या जागी ओबीसी समाजातीलच भागवत कराड यांना संधी देण्यात आली. या घटनांमुळे भाजपच्या नेतृत्त्वाकडून मुंडे भगिणींना जाणीवपूर्ण डावलण्यात येत आहे, असा आरोप मुंडे समर्थकांकडून केला जात आहे. त्यामुळे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे पदाधिकारी आता राजीनामा देऊ लागले आहेत. दरम्यान, आगामी काळात हे प्रकरण कसं वळण घेतं आणि भाजप नेतृत्वाकडून या नाराज पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यासाठी काही प्रयत्न केले जातात का, याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hYnMKW

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.