Type Here to Get Search Results !

कोल्हापूरः व्यापारी- प्रशासनातील वाद मिटला; व्यापारांनी घेतला 'हा' निर्णय

कोल्हापूरः प्रशासनाचे निर्बंध झुगारून कोल्हापुरातील बहुतांशी व्यापार्‍यांनी सकाळी आपली दुकाने उघडली. यामुळे महापालिका अधिकारी आणि व्यापारी यांच्यात अनेक ठिकाणी जोरदार वादावादी झाली. नंतर जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेतली. दोन दिवसात मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर सकाळी उघडलेली दुकाने दुपारनंतर हळूहळू व्यापाऱ्यांनी बंद केली. दुकाने सुरू करण्यावरुन गेले काही दिवस व्यापारी आक्रमक झाले आहेत. व्यापाऱ्यांनी गेली ८१ दिवस दुकाने बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य केले आहे. अडीच महिन्याहून अधिक काळ दुकाने बंद राहिल्याने त्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामुळे दुकाने उघडण्यास कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या नेतृत्वाखाली विविध संघटना एकवटल्या. २८ जूनपासून दुकाने उघडण्यात येतील असा निर्धार केला. दुसरीकडे कोल्हापुरात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पॉझिटिव्हिटी रेट १६ टक्क्यापर्यंत पोहचला आहे. प्रशासनाने पूर्वीसारखेच निर्बंध लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य दुकाने बंद राहतील असे आदेश प्रशासनाने काढले. पण प्रशासनाचे निर्बंध झुगारुन दुकाने सुरू करण्याचा ठाम निर्धार व्यापाऱ्यांनी केला. त्यानुसार सकाळी व्यापारी, व्यावसायिकांनी दुकाने उघडण्यास सुरुवात केली. काही ठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी निर्बंध कायम असून दुकाने उघडता येणार नाहीत असे बजावले. यावरुन व्यापारी व महापालिका अधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला. वाचाः चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांच्यासह संचालक मंडळाने शहरातील विविध बाजारपेठेत जाऊन दुकाने उघडण्याचे आवाहन केले. प्रशासनासोबत त्यांचा वादही झाला. व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत दुकाने उघडली. प्रशासनाने कारवाई केल्यास त्याला सामूहिक विरोध करण्याचा निर्णय झाला. काहीही कारवाई करा, आम्ही दुकाने उघडणार, अशी भूमिका घेत दुकाने उघडल्याने शहरात तणाव निर्माण झाला. व्यापाऱ्यांच्या या निर्णयामुळे महाद्वार रोड, ताराबाई रोड, लक्ष्मीपुरी, भाऊसिंगजी रोड यासह विविध ठिकाणची दुकाने उघडण्यात आली. त्यामुळे ८० दिवसानंतर शहरात गजबज वाढली. प्रशासनाने याची गंभीर दखल घेत तातडीने व्यापार्‍यांची बैठक घेतली. वाचाः जिल्हा पोलीसप्रमुख बलकवडे यांनी चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत लवकरात लवकर दुकान सुरू करण्याविषयी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. पोलीस अधिकारी व चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार व्यापाऱ्यांनी दुकान उघडण्याचा निर्णय मागे घेतला. आणखी दोन दिवस दुकाने बंद ठेवण्याचे यावेळी ठरले. कोल्हापूर शहर इचलकरंजी आणि उर्वरित ग्रामीण भाग असे दोन प्रशासकीय विभाग करण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन बलकवडे यांनी दिले. दोन दिवसात सरकारची मान्यता घेण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. कोल्हापूर शहरात पॉझिटिव्हिटी दर कमी असल्यामुळे त्याचा विचार करून शहरात दुकाने उघडण्यास परवानगी मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे व्यापार्‍यांनी पोलिसांच्या विनंतीनंतर दुपारनंतर दुकाने पुन्हा बंद करण्यास सुरुवात झाली. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/35UD3a3

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.