Type Here to Get Search Results !

कोल्हापुरात रेल्वे डब्याला मोठी आग; जीवितहानी नाही, पण...

सतीश घाटगे । कोल्हापुरातील राजर्षी शाहू रेल्वे स्थानकातील न्यू इंजिन लाईन पार्किंग यार्डमधील मोकळ्या रेल्वेच्या डब्याला ( Railway Coach Fire) आग लागली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी रेल्वे डबा जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. मोकळ्या डब्याच्या शेजारी असलेले रेल्वे डबे आगीपासून वाचले. तब्बल तीन तासांनंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. कोल्हापुरातून मध्यरात्री बारा नंतर कोणतीही रेल्वे वाहतूक होत नाही. रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पार्किंग यार्डमधील एका डब्याला आग लागली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी ताबडतोब अग्निशमन दलाला वर्दी दिली. पण आग भडकल्याने सगळा डबा पेटला. आगीच्या ज्वाला भडकू लागल्या. घटनास्थळी तीन अग्निशमन दलाचे बंब आले. अग्निशमन दलाचे उप मुख्य अधिकारी तानाजी कवाळे, कांता बांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन तासाच्या परिश्रमानंतर जवानांनी आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाला जीवन आपत्कालीन सेवा संघाने सहकार्य केले. आगीत पूर्ण डबा जळून खाक झाला. डब्यातील सीटस् पंखे जळून खाक झाले. डब्याची अंदाजे किंमत ९० लाख ते एक कोटी असून अंदाजे ४० ते ५० लाखाचे नुकसान झाल्याने अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. डबा रिकामा असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण आग कशामुळे लागली हे कळू शकलेले नाही. रेल्वे अधिकारी व पोलीस आगीच्या कारणांचा तपास करत आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ErjQfK

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.