Type Here to Get Search Results !

दोन मित्रांमध्ये टशन, बाजोरिया-खंडेलवाल आमनेसामने, विजयाचा गुलाल कुणाच्या खांद्यावर?

अकोला : अकोला बुलढाणा वाशीम मतदारसंघाची विधान परिषदेची निवडणूक होत असून त्यासाठी 22 नोव्हेंबरला अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात महाविकास आघाडीचे उमेदवार आणि भाजपचे उमेदवार यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. 26 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख होती पण कुणीही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने बाजोरिया आणि खंडेलवाल यांच्यात थेट लढत होत आहे. बाजोरिया यांच्या रुपाने शिवसेनेचा बालेकिल्ला भेदण्याचं मोठं आव्हान भाजपपुढे पर्यायाने खंडेलवाल यांच्यापुढे असणार आहे. आतापर्यंत बाजोरियांच्या सोबतीला असलेले खंडेलवाल यावेळी मात्र तगड्या प्रतिस्पर्ध्याच्या रुपात बाजोरियांना भिडणार आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत सलग तीन वेळा निवडून आलेले गोपीकिशन बाजोरिया आणि पहिल्यांदाच विधान परिषद निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले वसंत खंडेलवाल यांच्यात लढत होत आहे. मी विजयाचा चौकार मारणारच, असा विश्वास बाजोरिया वारंवार व्यक्त करत आहेत. तर बाजोरियांना चितपट करुन विधानपरिषदेत एन्ट्री करण्याचा मानस खंडेलवाल बोलून दाखवत आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया हे आतापर्यंत भाजप सेना युतीकडून नेहमी निवडून आले आहेत. पण यावेळी चित्र वेगळे आहे कारण राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता असल्याने महाविकास आघाडीकडून गोपीकिशन बाजोरिया लढत आहेत तर भाजपकडून वसंत खंडेलवाल हे लढत आहेत. दोन्ही उमेदवार सक्षम आहेत, त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. दोन्ही मित्रांमध्ये ही लढत होत आहे. या निवडणुकीत कुणाचे डावपेच कुणावर भारी पडतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. खंडेलवाल-बाजोरिया, कोण कुणावर भारी पडणार? अकोला, बुलढाणा,वाशिम या तिन्ही ठिकाणी खंडेलवाल आणि बाजोरिया दोघांचाही दांडगा जनसंपर्क संपर्क आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया हे जरी शिवसेनेचे असले तरी आतापर्यंत गोपीकिशन बाजोरिया यांनी केलेल्या काही चुका आणि मतदारांमध्ये असलेली नाराजी हे कुठेतरी या निवडणुकीत कारणीभूत ठरू शकते. काही दिवसांपूर्वी अकोल्यातल्या पोलीस लॉनवर बच्चू कडू यांनी संपर्क मेळावा आयोजित केला होता. पण या मेळाव्यामध्ये महाविकास आघाडीच्या मतदारांची उपस्थिती खूप कमी प्रमाणात दिसून आली. त्यामुळे बाजोरिया यांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे वसंत खंडेलवाल हे जरी सराफा व्यापारी असले तरी पूर्वीपासून संघ परिवाराची जोडलेले आहेत आणि नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे खंडेलवाल हे बैठका घेऊन आपल्या मतदारांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अकोला बुलढाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यासाठी ही निवडणूक होत आहे. खंडेलवाल यांचं पारडं जड, बाजोरियांचं टेंशन वाढलं! या निवडणुकीत दोन्ही उमेदवार जरी सक्षम असले तरी आतापर्यंतची परिस्थिती पाहता खंडेलवाल यांचं पारडं जड असल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे गोपीकिशन बाजोरिया यांचं टेन्शन वाढलं आहे. एका जमिनीच्या प्रकरणामध्ये गोपीकिशन बाजोरिया आणि त्यांचा मुलगा विप्लव बाजोरिया यांच्याविरोधात नागपूर हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे. त्याचा कुठेतरी या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो, असं बोललं जात आहे. अकोला महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे तसंच जिल्ह्यात भाजपचे 4 आमदार आहेत. त्यामुळे याचा फायदा खंडेलवाल यांना होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सध्यातरी वसंत खंडेलवाल यांचं पारडं जड दिसत आहे. विजयाचा गुलाल कुणाच्या खांद्यावर? तिन्ही जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त मतदार हे बुलढाणा जिल्ह्यातील आहेत, तर सर्वात कमी मतदार हे वाशिम जिल्ह्यात आहेत तर या निवडणुकीत 822 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून यात अकोल्यातील 287 तर वाशिम येथील 168 तर बुलढाणा येथील 367 मतदार या निवडणुकीत मतदान करणार असून यावेळी बदललेल्या समीकरणानंतर विजयाचा गुलाल कुणाच्या खांद्यावर पडतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31FSROL

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.