Type Here to Get Search Results !

पालकमंत्र्यांना म्हणाला, 'तुम्हाला बघून घेतो', यशोमती ठाकूरांनी तातडीने पोलिसांना फोन लावला अन्...

अमरावती : अमरावतीच्या पालकमंत्री (Yashomati Thackur) यांना धमकी देणाऱ्या तरुणाला गाडगे नगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. निवेदन देण्यासाठी सदर तरुण हा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आला असता त्याने पालकमंत्र्यासोबत वाद घातला आणि निवेदन स्विकारत नाही, असं दिसताच त्यांना 'बघून घेण्याची' धमकी दिली. त्यानंतर लगेचच पालकमंत्र्यांनी पोलिसांशी संपर्क करुन तरुणाविरोधात तक्रार केली. या संपूर्ण प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी बुधवारी आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. दुपारच्या सुमारास बैठक आटोपल्यानंतर पालकमंत्री आपल्या वाहनाकडे जात असताना काही व्यक्ती त्यांना निवेदन देण्यासाठी पुढे आले. ज्यामध्ये प्रवीण गाढवे नामक युवक आपल्या काही सहकाऱ्यांसह तिथे उपस्थित होता. अन् पालकमंत्र्यांचा पारा चढला...! मागील महिनाभरापासून एसटी कर्मचारी उपोषण करीत आहेत. आपण सरकार म्हणून त्यांची दखल घ्यावी आणि तोडगा काढावा अशी मागणी यावेळी प्रवीणने आपल्या निवेदनातून केली. मात्र अचानक कुणालाही काही कळण्याच्या आतच प्रवीण आणि यांच्यात काही कारणांवरुन शाब्दिक चकमक सुरु झाली आणि पालकमंत्र्यांचा पारा चढला. सदर तरुणाने आपल्याला 'बघून घेण्याची' धमकी दिली अशी तक्रार पालकमंत्र्यांनी गाडगेनगर पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांना फोनवरून दिली. आपल्या जीवाला काही बरंवाईट झालं किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात काही अनुचित प्रकार घडला तर त्याला सर्वस्वी हा तरुण जबाबदार राहिल, असंही पालकमंत्री ठाकूर यांनी आपल्या तक्रारीत सांगितले. दरम्यान, पालकमंत्र्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत प्रवीण गाढवे या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. सदर तरुण हा ओबीसी महासभेचा राज्य अध्यक्ष असल्याची माहिती मिळत आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rQgvmY

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.