Type Here to Get Search Results !

देव आणि स्वर्ग...किल्ले रायगडावरील स्फुल्लिंग चेतवणारा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!

रायगड: मुंबई, रायगड आणि कोकणसह महाराष्ट्रात बुधवारी पावसानं जोरदार हजेरी लावली. अवकाळी आलेल्या पावसानं शेतकरी आणि नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली. मात्र, पाऊस आणि रायगड किल्ल्यावरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओतून शिवप्रेमी आणि मराठी माणसाला एक सुखद अनुभव मिळतोय. डिसेंबर महिना सुरू झाला. हिवाळा सुरू झालाय. पण कडाक्याची थंडी अजून तरी पडली नाही. डिसेंबरच्या पहिल्याच तारखेला हवेत गारवा पसरला खरा, पण तो अवकाळी आलेल्या पावसामुळे. मुंबई, कोकण, रायगड, ठाणे यांसह संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि सगळ्यांचीच तारांबळ उडाली. अवकाळी आलेल्या पावसानं शेतकऱ्यांचं, बागायतदारांचं नुकसान झालंय. डिसेंबरमध्ये पाऊस तोही संततधार कोसळत असल्यानं सोशल मीडियावरून मिम्सचा अक्षरशः पाऊस कोसळत होता. या पावसानं सगळेच हैराण झाले. दुसरीकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे एक वेगळाच क्षण शिवप्रेमी आणि मराठी माणसाला अनुभवायला मिळाला. हा व्हिडिओ होता किल्ले रायगडावरचा. हा व्हिडिओ बुधवारी आणि आज दिवसभरही सर्वांच्याच व्हॉट्सअॅप स्टेटसला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्ज्वल्य इतिहासाचं स्फुल्लिंग चेतवणारा व्हिडिओ प्रत्येकाच्या अंगावर शहारा आणणाराच आहे. पाऊस आणि गडकिल्ल्यांची सफर म्हणजे पर्वणीच. ट्रेकर्स पावसाळ्यात हमखास या गडकिल्ल्यांची सफर करतात. ऊन असो की थंडी, वारा असो की तुफान पाऊस, या सगळ्यांशी झुंज देणारे आणि इतिहासाचे साक्षीदार बनून उभे असलेले गडकिल्ले. त्यात रायगडावरील सफर म्हणजे सगळ्यांसाठी पर्वणीच असते. हे हजारो, लाखो शिवप्रेमींचे श्रद्धास्थान. या किल्ल्यावरील मेघडंबरीमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं दर्शन घेण्यासाठी शिवप्रेमी जात असतात. याच किल्ले रायगडावरील कालचा म्हणजेच बुधवारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुफान पावसात रायगड किल्ल्याचं सौंदर्य खुलून दिसत होतं. पावसाच्या सरी आणि धुकं असं मनमोहक दृश्य दिसत होतं. याचाच एक व्हिडिओ किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकानं सोशल मीडियावर शेअर केला आणि बघता बघता तो तुफान व्हायरल झाला. पुढच्या काही तासांत शिवप्रेमींच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर तो व्हिडिओ झळकत होता. रायगड किल्ल्यावरील पाऊस आणि वारा कॅमेऱ्यात टिपला आहे. हे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारेच आहे. रायगडावरील मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि आजूबाजूचे चित्र कॅमेऱ्यात कैद केले आहे. हा व्हिडिओ नेमका कुणी काढला हे मात्र समजू शकलेले नाही. पण देव आणि स्वर्ग... एकाच वेळी दोन्हींचं दर्शन मिळालं, असं नेटकरी म्हणू लागले. काहींनी तर आयुष्यभर इथंच राहिलो असतो, अशी प्रतिक्रिया दिलीय.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xJcPUZ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.