Type Here to Get Search Results !

साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर नेतेमंडळी का नकोत?; भुजबळांचा सवाल

म. टा. खास प्रतिनिधी, 'साहित्य संमेलनांची आखणी करताना राजाश्रय हवा असतो. सरकारने तो द्यायलाही हवा. लेखक-साहित्यिकांसाठी राजकीय नेते मसाला पुरवत असतात. मग संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांनी का असू नये,' असा सवाल ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री यांनी भाषणात उपस्थित केला. 'नारळीकर, ठाले-पाटील आणि भुजबळ एकाच मंचावर साहित्य सोहळा करीत आहेत. हा बदल लक्षात घ्याल की नाही,' असा सवाल त्यांनी केला. संमेलनापासून राजकारण्यांना दूर ठेवण्याच्या चर्चांना एकप्रकारे भुजबळ यांनी सडेतोड उत्तरच दिले. 'राजकारणी मर्यादा पा‌ळून असतात. साहित्यिकांनीही आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवावे. त्यांच्यावर कोणी निर्बंध लादणार असेल, तर त्याला विरोध करणारा मी पहिला असेन,' असेही त्यांनी निक्षून सांगितले. 'ईडा-पीडा टळो अन् लोकशाही बळकट होवो,' असा टोला त्यांनी संमेलनाच्या व्यासपीठावरून विरोधकांना लगावला. भुजबळ यांनी साहित्य, इतिहास, विज्ञान अशा वेगवेगळ्या संदर्भांचा उल्लेख आपल्या भाषणात केला. हे संमेलन आपल्यासाठी खास असल्याचे नमूद करायलाही ते विसरले नाहीत. त्यासाठीची कारणमीमांसाही त्यांनी केली. 'जातनिर्मूलनाचा विषय साहित्य संमेलनात घेत नाही, म्हणून महात्मा जोतिबा फुले यांनी साहित्य संमेलनाचे निमंत्रण नाकारले होते. हळूहळू परिस्थिती बदलत गेली. आज त्यांचा एक छोटा अनुयायी याच मंचावरून तुमचे स्वागत करतो आहे. नारळीकर, ठाले-पाटील आणि भुजबळ एकाच मंचावर साहित्य सोहळा करीत आहेत. हा बदल लक्षात घ्याल की नाही,' असा सवाल त्यांनी उपस्थितांना उद्देशून केला. नाशिकचे नाव सुवर्णाक्षरांत साहित्य संमेलनाच्या इतिहासात नाशिकचे नाव सुवर्णाक्षरांत लिहिले जाईल. मुंबई येथे झालेल्या या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भूषविले होते. त्यांनी 'लेखकांनी हातात लेखण्या न घेता बंदुका घ्या' असा सल्ला दिला होता. पुढील काळात संमेलनाध्यक्षपदाचा मान तात्यासाहेब शिरवाडकर तथा कविवर्य कुसुमाग्रजांना लाभला. मराठी भाषेतील दुसरे ज्ञानपीठ त्यांना मिळाल्याची आठवण सांगून, भुजबळ यांनी त्यांची एका आदिवासी महिलेवरील कविता सादर केली. साहित्य व राजकारण वेगळे नाही 'साहित्य संमेलनात राजकारण आणि संमेलन याविषयी वेळोवेळी चर्चा होत आली आहे. सन १९४२च्या साहित्य संमेलनात 'साहित्य आणि राजकारण वेगळे नाही' याचा निर्वाळा आचार्य अत्रे यांनी दिला होता. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश मंडळ स्थापन करून साहित्य संवर्धन, ज्ञानसंवर्धन यांना गती दिल्याचे आपण जाणतो. शरद पवार स्वतः अनेक साहित्य संमेलनांना उपस्थित राहिले आहेत. आतापर्यंत तीन-चार संमेलनाचे उद्घाटन त्यांनी केले. त्यांची भाषणे साहित्य मंचावर कधीच राजकीय स्वरूपाची नसतात. कराड येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी केले होते. त्या वेळी त्यांनी आपल्या भाषणात राजकीय चर्चा केली नाही, तर मराठी साहित्यातील रससिद्धांतांवर भाष्य केले होते. साहित्य संमेलनाची आखणी करताना आपल्याला राजाश्रय हवा असतो. सरकारने तो दिला पाहिजे, असेच माझे मत आहे,' असे भुजबळ म्हणाले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DmAdc3

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.