Type Here to Get Search Results !

महापौरांवर टीका करताना आशिष शेलारांची जीभ घसरली, महिला आयोगाने मागवला अहवाल

मुंबई: मुंबईच्या महापौर यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्यामुळे भाजपचे नेते अडचणीत आले आहेत. मुंबईतील एका दुर्घटनेवरुन आशिष शेलार यांनी पालिका प्रशासन आणि महापौरांवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. राज्य महिला आयोगाने यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून अहवाल मागवला आहे. हा अहवाल आल्यानंतर राज्य महिला आयोगाकडून आशिष शेलार यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. तर दुसरीकडे शिवसेनेच्या महिला आघाडीकडूनही आशिष शेलार यांच्याविरुद्ध पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली जाणार आहे. त्यामुळे आशिष शेलार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. वरळीच्या बीडीडी चाळीतील दुर्घटनेनंतर आशिष शेलार यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. याठिकाणी सिलिंडरचा स्फोट होऊन काहीजण जखमी झाले होते. या घटनेत चार महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला तसेच बाळापाठोपाठ वडिलांचाही मृत्यू झाला. मुंबईच्या महापौर मात्र ७२ तास उलटल्यानंतर रुग्णालयात पोहोचल्या. याच मुद्द्यावरुन आशिष शेलार यांनी महापौरांना लक्ष्य केले होते. नायर रुग्णालयात पोहोचलेल्या जखमींना तब्बल ४५ मिनिटे उपचारांविना तसेच ठेवले गेले. त्यांच्यावर औषधोपचार नाही की विचारपूस नाही. या बेफिकिरीमुळे चार महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार टाळकं फिरवणारा आहे. त्यामुळे जनतेच्या मनातलाच प्रश्न आम्ही विचारतोय की मुंबई महापालिकेत चाललंय काय? सिलिंडर स्फोटाच्या ७२ तासांनंतर मुंबईच्या महापौर त्याठिकाणी पोहोचतात, एवढे तास कुठे निजला होतात, अशा आशयाचे वक्तव्य शेलार यांनी केले होते. आशिष शेलार यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्षाची नवी ठिणगी पडली आहे. हा वाद आता कोणत्या दिशेला जाणार आणि कितपत चिघळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तर दुसरीकडे बीडीडी चाळीतील दुर्घटनेवरुन शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही टीकास्त्र सोडले होते. वरळीतल्या स्थानिक आमदारांकडून काय अपेक्षा करणार? हे आमदार.. युवराज (आदित्य ठाकरे) तर हवेतच असतात, असा टोला आशीष शेलार यांनी लगावला होता. या मुद्द्यावरुन शिवसेना प्रचंड आक्रमक होण्याची शक्यता आहे


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31DyUIK

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.