Type Here to Get Search Results !

लोकलची गर्दी विभागण्यासाठी पश्चिम रेल्वेने सुचवला 'हा' उपाय

‌म. टा. प्रतिनिधी, मुंबईः मुंबई लोकलमधील प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील प्रवाशांना लवकरच वातानुकूलित लोकलमधून प्रवास करता येणे शक्य होणार आहे. ध्वनिप्रदूषणमुक्त आणि प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा, यासाठी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अलोक कंसल यांनी त्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांना तिकिटाच्या दरातील फरकाची रक्कम भरून वातानुकूलित प्रवास करता येईल. साधारण महिनाभरात या प्रयोगाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. प्रत्येक प्रवाशांने वातानुकूलित लोकल प्रवासाचा अनुभव घ्यावा, यासाठी हा प्रयोग करण्यात येत आहे. तत्पूर्वी याची अमंलबजावणी कशा प्रकारे होईल, याबाबत सविस्तर माहिती प्रवाशांना लवकरच देण्यात येईल. दरम्यान, वातानुकूलित लोकलच्या तिकीट दराबाबत निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून अपेक्षित आहे, असे अलोक कंसल यांनी सांगितले. करोना लाट ओसरल्यानंतर सध्या लोकलमधील प्रवाशांच्या गर्दीत सातत्याने वाढ होत आहे. अशा स्थितीत सामान्य लोकल प्रवाशांनी भरून, तर वातानुकूलित लोकल रिकाम्या धावत असल्याची तक्रार प्रवाशांकडून सातत्याने करण्यात येत होती. या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेकडे सध्या चार वातानुकूलित रेल्वेगाड्या आहेत. दोन रेल्वेगाड्या धावत असून, दोन राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सध्या १२ फेऱ्या होत असून, आणखी आठ फेऱ्या चालवण्याची मंजुरी देण्यात आली आहे. मुंबईत दाखल होणाऱ्या लोकल या वातानुकूलित असणार असून, प्रवाशांमध्ये वातानुकूलित लोकलचा प्रवास सुसह्य होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अर्धवातानुकूलित लोकल आणि पूर्णवातानुकूलित लोकल यांवरील प्रवासी सर्वेक्षण रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात आले असून त्यावर निर्णय येणे बाकी आहे. एमयूटीपी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या १९१ रेल्वेगाड्या या वातानुकूलित असणार आहे. मात्र, मुंबई लोकलचे भविष्य हे संपूर्ण वातानुकूलित लोकलचे आहे, असा दावाही कंसल यांनी यावेळी केला. पंधरा डबा फेऱ्या वाढणार अंधेरी ते विरारदरम्यान प्रवाशांच्या सुविधेसाठी १२ डब्यांच्या लोकलच्या जागी १५ डब्यांच्या लोकल सुरू करण्यात येणार आहेत. सध्या पाच रेल्वे गाड्यांच्या ४५ फेऱ्या होत असून, आणखी दोन रेल्वेगाड्यांनी फेऱ्या वाढवण्यात येतील, असे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wWYdkh

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.