Type Here to Get Search Results !

आर्यन खानला ताप; एसआयटीच्या चौकशीला गैरहजर

म. टा. प्रतिनिधी, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) विशेष तपास पथकाने (एसआयटी) बजावलेल्या समन्सला सोमवारी गैरहजर राहिला. ताप असल्याने समन्सला येऊ शकत नसल्याचे त्याने एनसीबीला कळवले आहे. दरम्यान, या पथकाने सोमवारी या प्रकरणाशी संबंधित मुंबईत काही ठिकाणांना भेट दिली. आर्यनच्या अटकेत खंडणीचा आरोप झाल्यानंतर एनसीबी मुंबईकडील सहा प्रकरणांचा तपास थेट मुख्यालयाने स्थापन केलेली 'एसआयटी' करीत आहे. हे १४ जणांचे तपास पथक शनिवारी मुंबईत आले. रविवारी त्यांनी आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट व अमली पदार्थांचा संशयित दलाल अचित कुमार यांची सुमारे चार तास चौकशी केली. सोमवारी आर्यनला समन्स बजावण्यात आला होता. पण तो गैरहजर राहिला. दुसरीकडे या तपास पथकाने सोमवारी दक्षिण मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलला भेट दिली. या टर्मिनल परिसरात व टर्मिनलवरूनच 'कोर्डेला' क्रुझवर दाखल झालेल्या आर्यनला एनसीबी मुंबईने अटक केली होती. त्यामुळे या जागेची पथकाने पाहणी केली. तसेच तेथील संबंधितांशी विस्तृत चर्चा केली व काही जणांची चौकशी केली. त्यानंतर या पथकाने लोअर परळ येथील इंडियाना हॉटेलला भेट दिली. याच हॉटेलजवळ या प्रकरणातील साक्षीदार व त्यानंतर खंडणी आरोपातील संशयित किरण गोसावी आणि अभिनेता शाहरुख खानची व्यवस्थापिका पूजा दादलानी यांची भेट घेतली होती. तेथे पूजा व किरण यांनी २५ कोटी रुपये खंडणीसंबंधी चर्चा केली होती, असा आरोप आहे. त्यामुळेच हे हॉटेल व तेथील सीसीटीव्ही कॅमेराचीदेखील या पथकाने तपासणी केली. प्रभाकर सैललाही समन्स? आर्यन खानच्या अटकेत २५ कोटींची खंडणी मागितली गेली होती, असा आरोप सर्वांत आधी या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर सैल याने केला होता. तसे शपथपत्र त्याने सामाजिक माध्यमांवर व्हायरल केले होते. त्यानंतर सैलला एनसीबीच्या दक्षता पथकाने चौकशी तसेच माहिती देण्यासाठी समोर येण्याचे आवाहन केले होते. पण तो आला नाही. आता मात्र आर्यनसह सहा प्रकरणांशी संबंधित सर्वांनाच विशेष तपास पथक समन्स बजावणार आहे. त्यामुळे मंगळवारी सैललाही समन्स बजावला जाण्याची शक्यता आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YtsvOZ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.