Type Here to Get Search Results !

'पॅकर्स अँड मूव्हर्स'ला ग्राहक आयोगाचा दणका; १० टक्के व्याजाने भरपाईचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, घरगुती सामानाची वाहतूक करताना साहित्याचे नुकसान करून, ग्राहकाला त्रुटीयुक्त सेवा देणाऱ्या '' कंपनीला ग्राहक आयोगाने दणका दिला आहे. साहित्याच्या नुकसानापोटी ३३ हजार ७५० रुपये तक्रार दाखल केल्यापासून दहा टक्के व्याजाने ग्राहकाला द्यावे, असे आदेश ग्राहक आयोगाने कंपनीला दिले आहेत. पुण्याच्या अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष जे. व्ही. देशमुख, सदस्य शुभांगी दुनाखे व अनिल जवळेकर यांनी हा निकाल दिला. निकालाच्या आदेशाची प्रत मिळाल्यापासून ४५ दिवसांच्या आत ही रक्कम न दिल्यास, त्यावर १२ टक्के व्याज आकारण्यात येईल; तसेच ग्राहकाला एकत्रित नुकसान भरपाईपोटी दहा हजार रुपये आणि तक्रार खर्चापोटी तीन हजार रुपये देण्यात यावे, असेही निकाल पत्रात नमूद करण्यात आले आहे. याबाबत रोहित कडेचा यांनी वीरेंद्र कडेचा यांच्या माध्यमातून 'बेस्ट पॅकर्स अँड मू्व्हर्स' (निगडी) यांच्या विरोधात ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती. तक्रारदारांना गुरगावातून पुणे येथे स्थलांतरित व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी घरगुती सामानाच्या वाहतुकीसाठी संबंधित कंपनीची सेवा घेतली. त्यासाठी २४ हजार रुपये व १८ टक्के जीएसटी द्यावा लागेल; तसेच बुकिंग केल्यापासून दोन ते तीन दिवसांत सामान स्थलांतरित करण्यात येईल, असे कंपनीमार्फत सांगण्यात आले; याशिवाय कंपनीने तक्रारदारांन साहित्याचा विमा उतरविण्याची विनंती केली. त्यानुसार, तक्रारदारांनी बुकिंग केल्यावर कंपनीतर्फे साहित्याचे पॅकिंग करण्यासाठी ट्रक पाठविण्यात आला. साहित्याचे पॅकिंग करताना कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून किचनच्या मार्बलचे नुकसान झाले. त्याच्या भरपाईपोटी पाच हजार रुपये बिलातून वजा करण्याचे आश्वासन कंपनीने दिले; मात्र, चार दिवसांत कंपनीने सामानाचे स्थलांतर केले नाही. तक्रारदारांनी वारंवार विनंती केल्याावर कंपनीने त्यांच्याकडे अतिरिक्त १८ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदारांनी ही रक्कम ऑनलाइन पाठवली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी साहित्याचे स्थलांतर करण्यात आले. त्यामध्ये तक्रारदारांची दुचाकी, सोफासेट व लाकडी खुर्चीचे असे सुमारे १ लाख ४२ हजार २५० रुपयांचे नुकसान झाले होते. त्यामुळे तक्रारदारांनी नुकसान भरपाईची मागणी केली. त्यासाठी नोटीसही पाठवली; मात्र, कंपनीने भरपाई न दिल्याने तक्रारदारांनी ग्राहक आयोगात धाव घेतली होती. त्याची दखल घेऊन आयोगाने कंपनीला नोटीस बजावली. मात्र, त्यांच्याकडून कोणीही हजर न झाल्याने आयोगाने तक्रार, प्रतिज्ञापत्र, कागदपत्रे ग्राह्य धरून हा आदेश दिला. प्रकरण काय? - रोहित कडेचा यांना गुरगावातून पुणे येथे स्थलांतरित व्हायचे होते. त्यासाठी २४ हजार रुपये व १८ टक्के जीएसटी भरून सामान नेण्यासाठी बुकिंग केले. - साहित्याचे पॅकिंग करताना कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून किचनच्या मार्बलचे नुकसान. त्यानंतर चार दिवसांत कंपनीने सामानाचे स्थलांतर केले नाही. - तक्रारदारांकडे अतिरिक्त १८ हजार रुपयांची मागणी; ती रक्कम भरल्यानंतर साहित्याचे स्थलांतर - हे करीत असताना दुचाकी, सोफासेट व लाकडी खुर्चीचे सुमारे १ लाख ४२ हजार २५० रुपयांचे नुकसान. - कंपनीकडून भरपाई देण्यास नकार. त्यामुळे तक्रारदारांची ग्राहक आयोगात धाव


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3D2flHQ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.