Type Here to Get Search Results !

'शाकाहारपूरक शहर' हा पुरस्कार स्वीकारल्यानं मुंबईच्या महापौर वादात

म. टा. विशेष प्रतिनिधी, शाकाहारपूरक आस्थापनांची भरभराट आणि मानव व इतर प्राण्यांसाठी एक उत्तम विश्व निर्माण व्हावे यासाठी पोषक वातावरण निर्मिती केल्याबद्दल 'पिटा इंडिया' संस्थेने २०२१ या वर्षाचा सर्वाधिक शाकाहारपूरक शहर () पुरस्कारासाठी मुंबई शहराची निवड केली आहे. महापौर यांनी मुंबईकरांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. एका विशिष्ट आहार पद्धतीचा पुरस्कार स्वीकारल्याने महापौर वादात सापडल्या असून, त्यांच्यावर विरोधी पक्षाने टीका सुरू केली आहे. मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून मांसाहारी-शाकाहारी वाद सुरू आहे. मांसाहाराचा तिटकारा करणारे अनेक बिल्डर, सोसायट्या मांसाहार करणाऱ्या कुटुंबांना आपल्या इमारतीमध्ये घरे विकत घेऊ देत नाहीत. यावरून सभागृहातही यावरून मोठा वाद झाला होता. मांसाहारी कुटुंबाला सदनिका नाकारणाऱ्या बिल्डरांवर कारवाई करण्याचा ठराव सभागृहाने मंजूर केला; मात्र पुढे त्याची अंमलबजावणी झालेली नाही. शाकाहार-मांसाहारावरून मुंबईत नेहमीच वादाची ठिणगी पडत असताना मुंबईच्या महापौरांनी शाकाहाराचा पुरस्कार करणाऱ्या पिटा इंडिया संस्थेकडून शुक्रवारी हा पुरस्कार स्वीकारल्याने पुन्हा या विषयाची चर्चा सुरू झाली आहे. भायखळा येथील महापौर निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी पालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, राणीबागचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी व पिटा इंडिया संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. महापौर यावेळी म्हणाल्या, 'आपण विचाराने, आहाराने, विहाराने शाकाहारी असले पाहिजे. प्राण्यांनाही मुक्त विहार करण्याला जागा असावी या दृष्टिकोनातून मुंबई महापालिकेने प्राण्यांसाठी उद्यान तयार केले आहे. मनुष्य, प्राणीधर्म पाळून मुक्या प्राण्यांवर प्रेम करू या.' समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख म्हणाले, 'महापौर या शाकाहारी आणि मासांहारी या दोन्ही प्रकारच्या मुंबईकरांच्या प्रथम नागरिक आहेत. त्यांनी अशा प्रकारचा पुरस्कार स्वीकारणे चुकीचे आहे. महापौर शाकाहाराचा पुरस्कार करणार असतील तर कोळी बांधवांनी मासेविक्री बंद करावी का? महापौरांनी हा पुरस्कार परत करावा.' मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी, 'मुंबई ही आगरी, कोळी समाजाची आहे. मुंबईने कधीच एका आहार पद्धतीचे समर्थन केले नाही व करणार नाही. महापौरांनी असे पुरस्कार स्वीकारणे योग्य नाही. मिळालेला पुरस्कार परत करावा', असे मत व्यक्त केले. ...यासाठीच पुरस्कार या पुरस्कार निवडीबाबत पिटा इंडिया संस्थेने आपले लेखी स्पष्टीकरण दिले आहे. 'मुंबईत शाकाहारींसाठी खाण्याचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. मोठ्या प्रमाणात शाकाहारी खाद्यपदार्थ पुरवठा करणारी हॉटेले आहेत. मुंबईत भारतातील चौथ्या क्रमांकाची मांसमुक्त लोकसंख्या राहते. त्यांच्यासाठी विविध प्रकारच्या कॉफी, पिझ्झा, बर्गरसह, वडापाव, मिसळपाव, शेव पुरी, कोथिंबीर वडी, रगडा पॅटिस यांसारखे स्वादिष्ट खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. प्राण्यांना क्रूर वागणूक न देणाऱ्या फॅशन आणि सौंदर्य प्रसाधनांचे ब्रँड उपलब्ध आहेत. यासाठीच हा पुरस्कार देण्यात आला आहे', असे पेटा इंडियाच्या व्हेगन फूड्स अँड न्यूट्रिशन स्पेशालिस्ट डॉ. किरण आहुजा यांनी म्हटले आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31NvoeE

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.