Type Here to Get Search Results !

धाडसी निर्णय! लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच लढविता येणार 'ही' निवडणूक

अहमदनगर: प्रतिबंधक लसीकरण वाढावे म्हणून प्रशासनातर्फे विविध ठिकाणी लस घेतल्याची सक्ती करण्यात येत आहे. अनेक शहरांत स्थानिक पातळीवर यासंबंधीचे वेगवेगळे नियम करण्यात आले आहेत. नगर जिल्ह्यातील पारनेर शहरात मात्र याचा संबंध थेट निवडणुकीशीच जोडण्यात आला आहे. तेथे सध्या नगरपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणाऱ्या उमेदवाराने आणि सोबतच्या कार्यकर्त्यांनी लस घेतलेली असावी, त्याशिवाय त्यांच्याकडून अर्ज स्वीकारला जाणार नाही, असा नियम पारनेरमध्ये करण्यात आला आहे. पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आजपासून (१ डिसेंबर) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. आधीपासूनच राजकीय चुरस वाढल्याने यावेळी पारनेरची ही निवडणूक विविध कारणांमुळे गाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाची भूमिका आणि प्रक्रियेची माहिती देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी सर्व पक्षांच्या प्रमुखांची बैठक घेतली. त्यामध्ये नियमांची माहिती देताना लसीकरणासंबंधीचाही नियम सांगण्यात आला. या निवणुकीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मात्र, त्याची एक प्रिंट काढून निवडणूक अधिकाऱ्यांना सादर करावी लागते. यासाठी उमेदवार आणि त्यांचे समर्थक येतात. यावेळी त्यांनी लसीकरण केलेले असावे. संपूर्ण लसीकरण आता शक्य नसेल तर किमान लसीचा एक डोस तरी घेतलेला हवा, असा नियम करण्यात आला आहे. त्यामुळे आता उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यासोबतच लस घेऊन त्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठीही धडपड करावी लागणार आहे. सध्या जिल्ह्यात लशींची टंचाई नाही, पुरेसा साठा उपलब्ध असल्याने सहज लस उपलब्ध होत आहे. त्यामुळे सध्या तरी या नियमाला कोणीही विरोध केलेला नाही. वाचा: निवडणुकीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया असली तरी उमेदवाराने प्रमुख कार्यकर्त्यांसोबत आणि शक्तिप्रदर्शन करीत अर्ज सादर करण्यास प्राधान्य दिले जाते. याचा फायदा लसीकरण वाढविण्यासाठी प्रशासनाने घेतल्याचे दिसून येते. यापुढे प्रचाराच्या टप्प्यांवरही लस प्रमाणपत्र आवश्यक केले जाण्याची शक्यता असल्याने एका बाजुला निवडणुकीची प्रक्रिया आणि प्रचाराचे नियोजन करताना उमेवार आणि कार्यकर्त्यांना लसीकरणही करून घ्यावे लागणार आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xDMCXM

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.