Type Here to Get Search Results !

'परराज्यातून माणसे येऊन इथल्या लोकांना मारहाण करतात आणि पोलीस...'

म. टा. विशेष प्रतिनिधी, केल्याने प्रचंड छळवणुकीला सामोरे जात असलेल्या घाटकोपरच्या साकीनाका येथील तरुण दाम्पत्याच्या तक्रारीवर पवई पोलिसांकडून तत्परतेने कारवाई झाली नसल्याने, मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी पोलिसांची खरडपट्टी काढली. तसेच न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे हे 'व्हिडीओ कॉन्फरन्सिंग'द्वारे हजर राहिल्यानंतर 'परराज्यातून माणसे येतात, आपल्या शहरात काहींना मारहाण करतात आणि पोलिस काहीच करत नाहीत!', अशा शब्दांत न्या. शाहरुख काथावाला यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने तीव्र आश्चर्य व्यक्त केले. अखेरीस पवई पोलिसांकडून राहिलेल्या त्रुटींविषयी चौकशी करून योग्य ती पावले उचलण्याची ग्वाही आयुक्तांनी न्यायालयाला दिली. मूळच्या गुजरातमधील बछाव तालुक्यातील चौबारी गावातील असलेल्या या जोडप्याने २४ डिसेंबर २०२० रोजी विवाह केला. तरुणी आपल्या कुटुंबासोबत जोगेश्वरीमध्ये राहायची, तर तरुण साकीनाका येथे कुटुंबासोबत राहतो. दोघांचेही एकमेकांवर प्रेम असल्याने त्यांनी विवाह केला होता. तरुण ब्राह्मण, तर तरुणी अहिर समाजातून आहे. या दाम्पत्याने दाखल केलेल्या याचिकेनुसार, 'या दोघांचे प्रेमसंबंध तरुणीच्या अहिर समाजाला रुचले नव्हते. तरुणीचे वडील व भाऊही याला तयार नव्हते. त्यामुळे तरुणीला बळजबरी गुजरातमध्ये नेण्यात आले आणि तिला तिच्या प्रियकराविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार दाखल करण्यास भाग पाडले. त्यामुळे प्रियकराला १६ मार्च २०२० रोजी अटक होऊन तो सुमारे साडेचार महिने तुरुंगात राहिला. त्यानंतर तरुणीचे पालक आणि मुंबईतील अहिर समाजाचे नेते व गावच्या सरपंचांनी तरुणीला बळजबरीने गुजरातला नेऊन अमित सावजी याच्यासोबत तिचा साखरपुडा करण्यात आला. मात्र, त्यानंतर मुंबईत आल्यानंतर तरुणीने तिच्या प्रियकरासोबत पळून जाऊन २४ डिसेंबर २०२० रोजी लग्न केले. मात्र, गावकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष असून त्यांना शांत करणे आवश्यक आहे, असे सांगून तरुणीला गुजरातमध्ये नेण्यात आले. तिथे जवळपास दीडशे पुरुषांनी तरुणीची प्रचंड अवहेलना केली. कालांतराने तरुणीने प्रियकराशी कसाबसा संपर्क साधत तिच्यावरील प्रचंड दबावाची माहिती दिली. त्यामुळे प्रियकराने पोलिसांत तक्रार देण्यासह उच्च न्यायालयात याचिकाही केली. मात्र, लॉकडाउन काळात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत तरुणी गुजरातमधूनच मोबाइलवरून हजर झाली आणि तिच्या अवतीभवती कुटुंबीय व गावकरी बसले असल्याने तिला प्रियकराविरुद्धच साक्ष देणे भाग पडले. त्यामुळे उच्च न्यायालयाने प्रियकराची याचिका फेटाळली. त्यानंतर तरुणीचे २४ मे २०२१ रोजी अमितशी बळजबरीने लग्न लावण्यात आले. मी तुला विकत घेतले आहे, असे म्हणत अमितने अनेक महिने तिची प्रचंड शारीरिक छळवणूक केली. १३ ऑगस्टला तरुणीने अमितच्या तावडीतून स्वत:ची कशीबशी सुटका करून घेत मुंबई गाठली आणि तेव्हापासून ती तिच्या प्रियकर पतीसोबत राहू लागली. मात्र, काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी तरुणाच्या घरी येऊन त्याच्या वडिलांना क्रिकेट बॅट व स्टम्पने प्रचंड मारहाण केली. त्यामुळे जोडप्याने उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतरच न्यायालयाच्या आदेशाने या कुटुंबाला २४ तास पोलिस संरक्षण मिळाले. गुरुवारच्या सुनावणीत खंडपीठाने अमितसह अन्य आरोपींचा खरपूस समाचार घेतला. तसेच जोडप्याच्या तक्रारीवर सर्व संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kvrY6S

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.