Type Here to Get Search Results !

अहमदनगर जिल्ह्यात निवडणुकांचे पडघम, महाविकास आघाडीचा लागणार कस

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या मतदार संघातील निवडणूक तूर्त टळली असली तरी इतर निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. बाजार समित्यांसह काही सहकारी संस्था तसंच मुदत संपलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्याही निवडणुका होत आहेत. या सर्वच ठिकाणी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत असलेल्या भाजपला थोपवण्यासोबतच महाविकास आघाडी टिकवून ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातील नेत्यांचा कस लागणार आहे. पहिल्या टप्प्यात नगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड, पारनेर व कोपरगाव या चार बाजार समित्यांच्या प्रारुप मतदार याद्या जाहीर झाल्या आहेत. अन्य १० बाजार समित्यांच्याही प्रारुप मतदार याद्या टप्प्या-टप्प्याने जाहीर होणार असल्याने आगामी तीन ते चार महिने गावपातळीवरील व तालुकास्तरीय राजकारण ढवळून निघणार आहे. मुदत संपलेल्या तसंच लवकरच मुदत संपणार असलेल्या बाजार समित्यांचा मतदार यादी व निवडणुकीचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी जाहीर केला आहे. यानुसार जिल्ह्यातील चार बाजार समित्यांच्या निवडणुकांचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. ११ नोव्हेंबर रोजी या चारही बाजार समित्यांच्या प्रारुप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. बाजार समित्यांपैकी कर्जत, जामखेड, पारनेर व कोपरगाव या चार बाजार समित्यांच्या प्रारुप मतदार याद्या जाहीर झाल्या आहेत. जानेवारी २०२२ च्या अखेरीस या बाजार समित्यांची निवडणूक होण्याची शक्यता आहे. राहिलेल्या श्रीरामपूर, संगमनेर, राहाता, अकोले, पाथर्डी, शेवगाव, राहुरी व नेवासे या ८ बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रमही लवकरच जाहीर होणार आहे. एकूण चार टप्प्यांत सर्व निवडणुका पार पडतील, अशी शक्यता आहे. बाजार समित्यांसोबतच नगरपालिका आणि नगरपंचायतींचेही बिगुल वाजलं आहे. प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत ठरवली जात आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असं चित्र असल्याने त्याचं प्रतिबिंब बाजार समित्यांच्या निवडणुकीतूनही उमटणार आहे. अर्थात बाजार समित्यांसारख्या स्थानिक स्तरावरील निवडणुकांतून तिसर्‍या फळीतील समर्थकांच्या राजकीय अस्तित्वाला चालना देण्याची संधी असल्याने या निवडणुकांत बर्‍याचदा पक्षीय भेदाभेद पाळला जात नाही. गावपातळीवरील नातेगोते, संबंध, व्यवसाय, व्यवहार यातून पक्षीय अस्तित्वापेक्षा स्वअस्तित्वाला महत्व दिलं जात असल्याचं दिसतं. दरम्यान, स्थानिक स्तरावर ज्याच्याशी जमेल, त्याच्याशी जमवून घ्या व पक्षाचा झेंडा उंचवा, असाच त्यांचा आदेश असतो. यावेळी मात्र राज्यातील राजकीय परिस्थिती थोडी वेगळी असल्याने थेट गावपातळीपर्यंत राजकीय चुरस येऊन ठेपली आहे. त्यामुळे मोठ्या नेत्यांही यामध्ये लक्ष घातले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यात या निवडणुकांचा उल्लेख करून तेथील सत्ता महाविकास आघाडीच्या ताब्यात द्या, असं आवाहन केलं होतं. त्यामुळे नगरसोबतच यावेळी कर्जत व जामखेड येथील बाजार समित्यांसाठी जास्त चुरस पाहायला मिळत आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Cd4YzC

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.