Type Here to Get Search Results !

रडायचं नाही लढायचं! अंबाबाई मंदिराबाहेर अंध व्यक्ती करत आहेत विविध व्यवसाय

सतीश घाटगे | : करोनाचे संकट कमी झाल्यानंतर करवीरनिवसिनी अंबाबाई मंदिरात (Ambabai Temple Kolhapur) भाविकांची दर्शनासाठी रांग लागली आहे. मंदिर परिसरात हार, फुले, गजरे, पुजेचं साहित्य आणि खेळण्यांसह अन्य व्यवसाय सुरू झाले आहेत. मात्र या व्यावसायिक आणि विक्रेत्यांमध्ये उठून दिसतात ते जन्माने असलेले विक्रेते. कॅलेंडर आणि मास्क विकत घ्या, म्हणून ते भाविकांना आवाहन करतात. अनेक कारणे सांगून नोकरी आणि व्यवसाय न करणाऱ्या धडधाकटांच्या डोळ्यात अंध व्यक्तींचा डोळस व्यवसाय झणझणीत अंजन घालणारा आहे. मंदिराचा पूर्व आणि दक्षिण दरवाजा, भवानी मंडपात अंध विक्रेते नवीन वर्षाचे मराठी, हिंदी, कन्नड भाषेतील कॅलेंडर विकतात. करोनामुळे काही जण मास्क विक्रीही करतात. काही ठिकाणी अंध दाम्पत्य एकत्र विक्री करतात, तर डोळ्याने दिसणारी पत्नी अंध पतीसह कॅलेंडर आणि मास्क विक्री करते. अंध आईला मदत करण्यासाठी त्यांचा मुलगाही व्यवसायात मदत करत असल्याचं चित्र पाहायला मिळते. दिवसातून १५ ते २० कॅलेंडरची विक्री होते. काही जण उपनगरातून मंदिर परिसरात विक्री करण्यासाठी येतात तर काही थेट जयसिंगपूर, कबनूरमधून कोल्हापुरात कॅलेंडर विक्रीसाठी येतात. एसटीचा संप असला तरी रेल्वेने ते कोल्हापुरात पोहोचतात. ‘कोल्हापूरचा अंध कधीही भीक मागणार नाही, पण वस्तूंची विक्री करुन स्वाभिमानाने जगणार’ असंही ते सांगतात. दरम्यान, ‘पर्यटक, भाविक आणि ग्राहकांनी कोणत्याही अंध विक्रेत्यांकडून वस्तू खरेदी करुन त्यांच्या जगण्याच्या लढाई मदत करा’, हे सांगायलाही ते विसरत नाहीत. अंबाबाईच्या मुर्तीसमोर नतमस्तक होणाऱ्या भाविकांनी या अंधाच्या लढाईला बळ देण्यासाठी एक मास्क किंवा एक कॅलेंडर खरेदी केले तर खऱ्या अर्थाने माणुसकीचा धर्म जपला जाईल.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3D0m8l8

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.