Type Here to Get Search Results !

'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाबतीत नेमकं तेच घडताना दिसतंय'

मुंबई: कृषी कायदे मागे घेण्याची जाहीर घोषणा पंतप्रधान (Narendra Modi) यांनी केल्यानंतरही शेतकऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवलं आहे. संसदेत ठराव करून हे कायदे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळं केंद्र सरकारची कोंडी झाली आहे. हीच संधी साधत शिवसेनेनं भाजप व मोदींवर खोचक शब्दांत टीका केली आहे. 'रोज शब्दांचे बुडबुडे फोडत राहिले की, गांभीर्य कमी होते. लोकांचा विश्वासही राहत नाही. मोदींच्या बाबतीत नेमकं तेच घडताना दिसत आहे,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून (Saamana Editorial) शेतकरी आंदोलनाचं विश्लेषण सुरूच आहे. सुरुवातीला कायदे मागे घेतल्यानंतर शिवसेनेनं सरकारला धारेवर धरलं होतं. आता शेतकऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेवरून शिवसेनेनं मोदी सरकारच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह लावलं आहे. 'देशाच्या पंतप्रधानांचा शब्द मानायला शेतकरी तयार नाहीत. शेतकऱ्यांचा पंतप्रधानांवर विश्वास नाही. पंतप्रधान बोलतात तसं करतीलच याची खात्री नाही. पंतप्रधानांकडं लोकसभेत बहुमत आहे, पण लोकांचा विश्वास गमावला आहे. हे चित्र चांगलं नाही,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे. 'लोकसभेत बहुमताच्या बळावर मंजूर केलेले कायदे बाहेर लोकांनी झिडकारले तरीही पंतप्रधान लोकांचं ऐकायला तयार नव्हते. शेवटी लोकांचा रेटा वाढल्यानं कायदे मागे घ्यावे लागले. मोदींचं मन किती मोठं आहे, अशा थाळ्या आता वाजवल्या जात आहेत, पण या काळात ७०० शेतकऱ्यांनी प्राण गमावले. हे काही मोठ्या किंवा दिलदार मनाचं लक्षण नाही,' असा टोला मोदींच्या निर्णयाचं कौतुक करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेनं हाणला आहे. वाचा: 'कायदे तोंडपाटीलकी करून मागे घेतले जात नाहीत. ते संसदेत मागे घ्या, असा पेच शेतकऱ्यांनी टाकला आहे. त्याचे कारण शेतकरी आता पुन्हा फसवणूक करून घ्यायला तयार नाहीत. कृषी कायदे आज मागे घेतले असले तरी ते पुन्हा लागू होणारच, असं राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी म्हटलंय. त्यामुळंच शेतकरी घरी जायला तयार नाहीत. पंतप्रधानांची घोषणा ही काळ्या दगडावरची रेघ असते, विश्वास असतो; पण कृषी कायद्याच्या बाबतीत पंतप्रधानांचा शब्द मानला जात नाही. हे असं का याचा विचार मोदींनी करायला हवा. लोकांच्या दबावापुढं अनेकदा झुकावं लागतं, पण हा रेटा आणि लोकभावना वेगळीच आहे,' असा इशाराही शिवसेनेनं दिला आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32s2EIP

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.