मुंबई: एनसीबीच्या कथित बोगस कारवाया व त्यात सहभागी असलेल्या लोकांशी भाजपचे संबंध असल्याचा आरोप केल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर भाजपकडून टीका होत आहे. मलिक यांच्या भंगार व्यवसायाला लक्ष्य केलं जात आहे. त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले जात आहेत. त्या आरोपांना मलिक यांनी आज उत्तर दिलं. भाजपशी संबंधित यांचा मेहुणा कॉर्डेलिया क्रूझवरील पार्टीत होता. मात्र, त्याला सोडून देण्यात आलं, असा आरोप सुरुवातीलाच मलिक यांनी केला होता. तेव्हापासून कंभोज व अन्य काही नेत्यांनी मलिक यांना लक्ष्य केलं आहे. भंगारवाला म्हणून त्यांना डिवचलं जात आहे. यावर मलिक यांनी आज प्रतिक्रिया दिली. 'होय मी भंगारवाला आहे. माझे वडील मुंबईत कपडे आणि भंगारचा धंदा करत होते. वयाच्या १६ व्या वर्षापासून आमदार होईपर्यंत मी स्वत: भंगारचा धंदा करत होतो. माझ्या भावाचंही भंगारचं गोडाउन आहे, हवं तर तिथं जाऊन फोटो काढा. माझं कुटुंब हा व्यवसाय करतं. याचा मला अभिमान आहे,' असं मलिक म्हणाले. मात्र, माझ्या आजोबांनी बनारसमधील कुठल्याही डाकूकडून सोनं खरेदी केलेलं नाही, माझ्या वडिलांनी कुठल्याही चोरांकडून सोनं घेतलेलं नाही, मी कधी मुंबईत सोन्याचं स्मगलिंग केलेलं नाही, मी कुठलंही बुलियन मार्केट बुडवलेलं नाही, मी फ्रॉड करून बँकांचे पैसे खाल्लेले नाहीत, मी बोगस कंपन्या निर्माण करून बँकांचे शेकडो कोटी बुडवलेले नाहीत, माझ्या घरी कधीही सीबीआयची धाड पडलेली नाही, मी एखाद्या संस्थेला दिलेला चेक बाऊन्स झालेला नाही, मी मुख्यमंत्री निधीला चेक देऊन बाऊन्स करवून घेतला नाही,' असा टोला मलिक यांनी कंभोज यांचं नाव न घेता हाणला. 'भंगारवाला काय करतो हे त्यांना माहीत नाही. भंगारवाला जुन्या वस्तू जमवून त्यांचे तुकडे-तुकडे करतो, भट्टीत टाकतो आणि त्याचं पाणी करतो. या शहरात जितकं 'भंगार' आहे, त्यांचे नटबोल्ट खोलून भट्टीत टाकणार आहे. त्यांचं पाणी-पाणी केल्याशिवाय राहणार नाही,' असा इशारा मलिक यांनी दिला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3blvqvN