Type Here to Get Search Results !

दूध उत्पादकांनी दगडाला घातला दुग्धाभिषेक; नेमकं काय घडलं?

म.टा. प्रतिनिधी, नगर: पूर्वीच्या आंदोलनानंतर केवळ बैठक झाली, त्यातील निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप करीत राज्यातील दूध उत्पादक शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरले. ठिकठिकाणी दूध संकलन केंद्राबाहेर दगडाला दुग्धाभिषेक घालून सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून हे आंदोलन करण्यात आले. गायीच्या दुधाला किमान ३५ रुपये व म्हशीच्या दुधाला ६० रुपये प्रतिलिटर खरेदी दर मिळावा ही प्रमुख मागणी आहे. राज्यातील दूध उत्पादक पट्टयात आंदोलन करण्यात आले. अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, जालना, बुलढाणा, लातूर, ठाणे, जळगाव या दूध उत्पादक जिल्ह्यांमध्ये दूध संकलन केंद्रावर निदर्शने करत व दुधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांनी आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. सरकारने दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे चालविलेल्या या दुर्लक्षाचा निषेध करण्यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यासंबधी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे डॉ. अजित नवले यांनी सांगितले, 'लॉकडाऊनचा कांगावा करत राज्यातील दूध कंपन्यांनी दुधाचे दर १५ रुपयांनी पाडले. त्यानुसार दूध उत्पादकांची लूटमार सुरूच ठेवली आहे. पूर्वी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी मंत्रालयात शेतकरी संघटना व दूध कंपन्यांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेतली. दुधाचे दर या बैठकीनंतर वाढतील व राज्यात दुधाला एफ. आर. पी. देणारा कायदा केला जाईल असे आश्वासन यावेळी सुनील केदार यांनी दिले. प्रत्यक्षात मात्र दीड महिना उलटून गेला तरी दर वाढविण्यात आले नाहीत. दुधाला एफ. आर. पी. लागू करण्यासाठी दुग्धविकास विभागाने कॅबिनेट नोट बनवून महसूल व सहकार विभागाकडे अभिप्रायासाठी पाठविली. मात्र पुढे याबाबतही काही झाले नाही. त्यामुळे पुन्हा इशारा आंदोलन करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व दुग्धविकास मंत्र्यांना गावोगावातून हजारो मेल करून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या सरकारला कळविल्या.' राज्यभरात ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनासाठी डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, श्रीकांत करे, दादा गाढवे, सुधीर रंधे,उमेश देशमुख, सिद्धप्पा कलशेट्टी, कविता वरे, दीपक वळे, नंदू रोकडे, जोतिराम जाधव,अमोल नाईक,धनंजय धोरडे, अमोल गोर्डे, अमोल नाईक, सुदेश इंगळे, रमेश जाधव,रामदास वदक, अशोक पटेकर, विकास बगाटे, सूर्यकांत काणगुडे, विजय वाकचौरे, राजू भांगरे, विकास वाकचौरे, खंडू वाकचौरे यांनी पुढाकार घेतला.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AugWV9

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.