Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात बाराशे गुंड; करडी नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी आखला अॅक्शन प्लान

म .टा. प्रतिनिधी, नगर: विस्ताराने राज्यातील मोठा जिल्हा असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात पूर्वीपासूनच गुन्हेगारीही मोठ्या प्रमाणात आहे. अधूनमधून डोके वर काढणाऱ्या या गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी पोलिसांनी काही योजना हाती घेतल्या आहेत. सराईत गुन्हेगारांची माहिती अद्ययावत करून त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यात १२०९ गुंड, ५३६ हिस्ट्रीशीटर, १४२ गुन्हेगारी टोळ्या, ४२७८ दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेले आरोपी अशा नोंदी अद्ययावत करण्यात आल्या असून त्यांच्याविरूद्ध योग्य ती कारवाई करून नजर ठेवण्यात येत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून यासाठी विविध योजना आखण्यात आल्या आहेत. यासाठी तंत्रज्ञानाचीही मदत घेण्यात येत आहे. गुन्हेगार पुन्हा पुन्हा गुन्हे करीत असल्याचे आढळून आल्याने जानेवारी महिन्यापासून पोलिसांनी टू पल्स ही योजना सुरू केली आहे. यामध्ये दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची माहिती वेगळी संकलित करून त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे. २०११ पासूनचे असे ४२७८ आरोपी असल्याचे आढळून आले. त्यांची माहिती संकेतस्थळावर नोंदविण्यात आली असून नवीन गुन्हे घडल्यावर ती पडताळून पाहणे शक्य होणार आहे. एका बाजूला या आरोपींविरूदध कायदेशी कारवाई सुरू करताना त्यांचे मेळावे घेऊन मतपरिवर्तन करण्याचेही पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पाटील यांनी दिली. सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांचे हिस्ट्रीशीट तयार करण्यात येते. हे रजिस्टरही अद्ययावत करण्यात आले असून त्यामध्ये आता जुन्या नव्या ५३६ आरोपींची नोंद आहे. यासोबतच प्रत्येक पोलिस ठाण्यातील गुंडा रजिष्टर अद्ययावत करण्यात आले आहे. त्यामध्ये १२०९ गुंडांची नोद आहे. पूर्वी ही संख्या ९०१ होती. त्यातील मृत्यू किंवा अन्य कारणांमुळे २०९ जणांची नावे यातून कमी झाली. मात्र, नवे ५१७ गुंड वाढले. या सर्वांवर आता लक्ष ठेवण्यात येत आहे. गुन्हेगारी टोळ्यांचाही उपद्रव आहे. अशा १४२ टोळ्या आढळून आल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत ४ टोळ्या हद्दपार करण्यात आल्या असून २४ टोळ्यांचे प्रस्तावांनर कारवाई सुरू आहे. सहा टोळ्यांविरूद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्को) कारवाई करण्यात आली आहे, अशी माहितीही पाटील यांनी दिली. या कामासाठी परिश्रम घेतलेले अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, आर. डी. बारवकर, एस. एस. जोशी, ए. के. गोलवड, आर. व्ही. जाधव यांच्यासह संबंधित पोलिसांचा पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. नगरचा प्रथम क्रमांक राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम (सीसीटीएनएस) नुसार कामकाज करण्यात नगर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आला आहे. राज्यात ४८ युनिटमध्ये या पद्धतीने काम केले जात आहे. त्यामध्ये नगर जिल्ह्याचा मे २०२१ या महिन्यात ९३ टक्के गुण मिळून प्रथम क्रमांक आला. त्यापूर्वीच्या दोन महिन्यांतही नगरची कामगिरी चांगली होती. याशिवाय महिला व बालकांसंबंधीच्या गुन्ह्यांचा वेगाने तपास करून दोषारोपपत्र दाखल करण्यातही नगरची कामगिरी चांगली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून याचे मूल्यांकन केले जाते. २०२० ते २०२१ या काळात यासंबंधीची पूतर्ता करण्याचे नगर जिल्ह्यातील प्रमाण ६५ टक्के असल्याचे पाटील यांनी सांगितले. पूर्वी ते अवघे २५ टक्के होते.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kbywrX

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.