सांगली : राज्यात मुसळधार पावसाने दाणादाण उडवली असताना कोकणातील चिपळूण, महाड आणि खेड, संगमेश्वर या परिसरात पुराने वेढा घातला आहे. अनेक नद्या आणि धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. घरं, दुकानं पाण्याखाली गेल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच आता सांगलीलासुद्धा पुराचा धोका वाढला आहे. कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना आणि इतर गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये अचानक वाढ झाली आणि त्यामुळे सांगलीला पुराचा धोका असल्याची माहिती समोर येत आहे. काही गावांमध्ये पाणी शिरले असून लोकांच्या घरातही पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. इतकंच नाहीतर कोयना धरणात तुफान पाऊस सुरू आहे. यामुळे कोरणा धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून यामुळे सांगली आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पुराचा धोका आहे. सातारा, महाबळेश्वर, कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे कोल्हापूरमधील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. ग्रामीण भागात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. यामुळे गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात येत आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zurzqa