Type Here to Get Search Results !

तीक्ष्ण हत्याराचा धाक दाखवून अडीच लाखाच्या रक्कमेसह थेट तिजोरीच पळवली!

: जळगाव शहरातील जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्था मर्यादीत या संस्थेच्या कार्यालयातून अडीच लाख रुपयांसह तिजोरी पळवल्याची घटना घडली आहे. या कार्यालयात झोपलेल्या मामा-भाच्यांना तीक्ष्ण हत्याराचा धाक दाखवून पाच दरोडेखोरांनी ही चोरी केली आहे. ही खळबळजनक घटना आज मंगळवारी पहाटे पावणेचार ते सव्वा चार वाजेच्या दरम्यान घडली आहे. जळगाव शहरातील जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेत दूध, खत, पारलेचे उत्पादने, कापड विक्री केली जाते. विकास दूध एजन्सीमधून वाहनचालक घनशाम पंडीत सोनार (वय ३८, रा. कुसंुबा) व त्यांचा भाचा तथा क्लिनर पियुष सोनार हे दोघे दररोज पहाटे ३.३० वाजता संस्थेच्या कार्यालयात टेम्पोमधून दूध घेऊन येतात. यांनतर सकाळी सहा वाजेपर्यंत सोनार मामा-भाचे कार्यालयात झोपलेले असतात. मंगळवारी पहाटे नेहमीप्रमाणे दोघे संस्थेच्या कार्यालयात झोपलेले होते. यावेळी बाहेरच्या एका दरवाजाचे कुलूप तोडून चार चोरटे कार्यालयात शिरले. या चोरट्यांनी मानवी मनोरा तयार करुन तसेच इतरत्र लक्ष ठेऊन कार्यालयाच्या बाहेरचा सीसीटीव्ही कॅमेरा तोडला. या चोरट्यांचा आवाज येताच सोनार बाहेर येण्याचा प्रयत्न करीत असताना चोरटे आत शिरल्याने त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून सोनार यांना गुपचूप पडून राहण्यास सांगितले. एक चोरटा सोनार याच्यांजवळ तीक्ष्ण हत्यार घेऊन थांबला. उर्वरित तिघांनी कोपऱ्यात ठेवलेली तिजोरी काढली. तिजोरीचे वजन जास्त असल्यामुळे त्यांनी जमिनीवर घासतच तिला बाहेर काढले. या तिजोरीत अडीच लाख रुपयांची रोख रक्कम होती. तसंच ३५०० रुपयांचा एक सीसीटीव्ही कॅमेरा, ६ हजार रुपयांचे दोन राऊटर, ७ हजार रुपयांचे कबाईन युनीट असा २ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेतला. सर्व सामान एका कारमध्ये घेऊन चोरट्यांनी ४ वाजून १५ मिनिटांनी घटनास्थळाहून पलायन केले. चोरटे निघून गेल्यानतंर सोनार यांनी समोरच्या बिल्डींग बाहेरील सुरक्षारक्षक पाटील यांना घटना सांगितली. त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फोन करुन माहिती दिली. यानंतर सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरांची तपासणी करुन चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yrHAwB

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.