Type Here to Get Search Results !

आधी कोरोनाचा हैदोस, आता वाघाची दहशत, खामगावातील शाळांना टाळं

बुलडाणा: गेल्या तीन दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात वाघाचा मुक्तसंचार असल्याने शहरात अध्याप दहशत आहे. गेल्या शनिवारपासून वन विभागाच्या अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा अशा ४ टीम वाघोबाचा शोध घेत आहे. वाघाच्या जवळ पोहचल्यावर सुद्धा वाघाला बेशुद्ध करण्यात कर्मचाऱ्यांना अपयश आले आहे. शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी हा वाघ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तरीही वन विभागाच्या पथकाला हुलकावणी देत हा वाघ शहर आणि परिसरात अनेकांना दिसतो आहे. खामगाव शहरात अजूनही भीतीचं वातावरण असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाघाचा वावर असलेल्या भागातील आज सलग दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शाळांनी स्वतः घेतलाय. आधी कोरोनाने शाळा बंद होत्या. कोरोनाच्या प्रकोपाने विद्यार्थ्यांना कित्येक महिने शाळेत जाता आलं नाही. आधी कोरोनाचा हैदोस, आता वाघाची दहशत कोरोनाचे आकडे जरा कमी होऊ लागल्याने शाळा सुरु झाल्या होत्या. मात्र काहीच दिवसांत आता वाघोबाच्या दहशतीने शाळांना टाळं लावण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे वन विभागाने युद्धस्तरावर शोध मोहीम राबवूनही हा वाघ जेरबंद होत नाहीये. त्यामुळे आता वाघाचं जेरबंद करण्यात वनविभागाला कधी यश येतंय, याच्या प्रतिक्षेत खामगाववासिय आहेत. रेस्क्यू ऑपरेशनसाठी कलम १४४ लागू रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान नागरिकांची गर्दी होऊन अडथळा निर्माण होऊ नये यासाठी कलम १४४ नुसार संचारबंदी करण्यात आली आहे. सिंधी लाईन सुटाळपुरा, फरशी, महाकाल चौक, चोपडे मळा, रायकल कॉलनी यासह इतर भागात संचार बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. खामगाव शहरात आज सकाळी एका गायीचं वासरु मृत पावलं आहे. खामगाव शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी वेस भागात ही घटना घडली आहे. वन विभागाचे टीम घटनास्थळी दाखल झाली असून सर्च ऑपरेशन सुरु आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3y3vKK4

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.