Type Here to Get Search Results !

विज्ञानयुग आणि विज्ञान साहित्य

विज्ञान म्हणजे आपल्या आकलनाच्या पलीकडले असा बहुतेक साहित्यिकांचा ग्रह असल्याने ते आपली प्रतिभा विज्ञानाच्या दिशेने चालवायला धजत नाहीत. अनेकदा वाचक किंवा श्रोतेही आपल्याला वैज्ञानिक तथ्ये समजणारच नाहीत, असा ग्रह बाळगतात. विज्ञान कथालेखकांची ही अवस्था, तर विज्ञान समाजापर्यंत मनोरंजक पद्धतीने मांडण्याचे काम किती लोक करतात? सुदैवाने असे लेखन करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. तरीदेखील अद्याप समाजात विज्ञानाने पाय रोवलेले नाहीत. खगोलशास्त्र आणि फलज्योतिष यांच्यातला मूलभूत फरक अजून तथाकथित सुशिक्षितांनाही कळत नाही, हे पाहून मन खिन्न होते... नाशिक येथे शुक्रवारपासून (तीन डिसेंबर) सुरू झालेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित अंश. कुठल्याही भाषेतले साहित्य ती भाषा वापरणाऱ्या समाजातील घडामोडींनी प्रभावित झालेले असते. साहित्याचा कोणताही विषय असो, ते लिहिणारा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीपासून अलिप्त राहू शकत नाही; परंतु याचा अर्थ असा नव्हे, की सामाजिक घडामोडींचे संपूर्ण प्रतिबिंब साहित्यात उमटते. एखादी भाषा पुष्कळ विकसित असेल, तर समाजाचे बहुतेक पैलू तीत उमटतात; परंतु काही पैलू भाषेकडून उपेक्षिले गेले, तर त्याबाबत तिला असमृद्ध समजले पाहिजे. अशा मानदंडाद्वारे आपण असे म्हणू शकतो, की इंग्रजी भाषा मराठी भाषेपेक्षा अधिक समृद्ध आहे. मराठीचे अपूर्णत्व सर्वांत जास्त जर कुठे जाणवत असेल तर ते विज्ञान साहित्यात. विसावे शतक हे विज्ञानाचे शतक म्हटल्यास चूक ठरणार नाही. आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद आणि प्लांक-आइन्स्टाइन-बोर यांचा पुंजवाद हे दोन महत्त्वाचे मूलभूत सिद्धांत त्या शतकाच्या पहिल्या १५ वर्षांत भौतिकशास्त्राला मिळाले. अमूर्त गणिताच्या अनेक नव्या शाखा या शतकात चालू झाल्या. वर्षानुवर्षे न सुटू शकणारे प्रश्न चुटकीसरशी सोडवणारी गणकयंत्रे शतकाच्या उत्तरार्धात निघाली. विश्वाचे विराट दर्शन आणि अणूच्या अंतरंगाचे सूक्ष्म दर्शन मानवाला आज पाहायला मिळत आहे. जीवशास्त्राच्या मुळाशी असलेला डीएनए रेणू शास्त्रज्ञांना सुमारे सहा दशकांपूर्वी गवसला. विज्ञानाची ही गरुडझेप तंत्रज्ञानाच्या रूपाने मानवी जीवन अधिक प्रगत, विकसित करायला कारणीभूत ठरली. विज्ञान साहित्य म्हणजे काय? वैज्ञानिक संशोधनाचे प्रबंध किंवा एखाद्या विषयातील पोटशाखेत जागतिक स्तरावरील संशोधनाचा आढावा यांना मी विज्ञान साहित्यात धरत नाही; परंतु एखादा वैज्ञानिक शोध जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी लिहिलेले लेख मी विज्ञान साहित्यात धरेन. अर्थात, एखाद्या वैज्ञानिक कल्पनेला मुळाशी धरून त्याभोवती रचलेली कथा किंवा कादंबरी मी विज्ञान साहित्य म्हणून मानली, तर त्याबद्दल कोणाचा आक्षेप असू नये. मराठीतील विज्ञान साहित्याकडे वळण्यापूर्वी मी इंग्रजी भाषेतील काही उदाहरणे घेतो. केवळ एक अपवाद (पहिलाच!) सोडून! या आधीच्या शतकात विज्ञानयुगाची चाहूल लागली. टेलिग्राफ, टेलिफोन, आगगाड्या, औद्योगिक क्रांती यांचा अनुभव अनेक देशांना आला होता. अशा पार्श्वभूमीवर जुल्स व्हर्न याने 'ऐंशी दिवसांत पृथ्वीप्रदक्षिणा' अशासारखे पुस्तक लिहिले. विज्ञानाचे मनोरंजक चित्र समाजापुढे उभे करायचे काम अनेक लेखकांनी केले आहे. विज्ञानाची ओळख जनसामान्यास करून देण्याची प्रथा एकोणिसाव्या शतकात मायकेल फॅरॅडे याने सुरू केली. फॅरडेने भाषणे, प्रयोग, प्रात्यक्षिके, लेखन आदी करून आपले शोध सोप्या भाषेत समजावून सांगितले. त्या प्रयत्नांतून जन्माला आलेली विज्ञानसंस्था रॉयल इन्स्टिट्यूशन आजही ते काम चोख बजावत असते. अशा पार्श्वभूमीवर मराठी साहित्याकडे पाहिले, की त्यात विज्ञान साहित्य किती अल्प आहे, ते दिसून येईल. विज्ञानकथा लेखक केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतके आणि प्रतिष्ठित साहित्यिकांमध्ये विज्ञानाबद्दल (आदर असला तरी) एक प्रकारची भीती दिसते. विज्ञान म्हणजे आपल्या आकलनाच्या पलीकडले असा बहुतेक साहित्यिकांचा ग्रह असल्याने ते आपली प्रतिभा विज्ञानाच्या दिशेने चालवायला धजत नाहीत. अनेकदा वाचक किंवा श्रोतेही आपल्याला वैज्ञानिक तथ्ये समजणारच नाहीत, असा ग्रह बाळगतात. विज्ञान कथालेखकांची ही अवस्था, तर विज्ञान समाजापर्यंत मनोरंजक पद्धतीने मांडण्याचे काम किती लोक करतात? सुदैवाने असे लेखन करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. तरीदेखील अद्याप समाजात विज्ञानाने पाय रोवलेले नाहीत. खगोलशास्त्र आणि फलज्योतिष यांच्यातला मूलभूत फरक अजून तथाकथित सुशिक्षितांनाही कळत नाही, हे पाहून मन खिन्न होते. हा फरक एका आधुनिक उदाहरणाने स्पष्ट करतो. 'अपोलो-११' या अंतराळ स्वारीत मानवाने चंद्रावर जाऊन दाखविले. त्याचे सविस्तर वर्णन अनेक वृत्तपत्रांतून आणि नियतकालिकातून प्रसिद्ध झाले. अशीच चंद्रावरच्या स्वारीतील हकिगत जूल्स व्हर्नच्या लिखाणात सापडते. समजा, इतर कुठलीही माहिती उपलब्ध नसेल, तर या दोन स्वाऱ्यांपैकी वास्तविक कुठली आणि काल्पनिक कुठली ते सांगता येणार नाही; परंतु जर अधिक खोलात शिरलो तर आपल्याला अंतराळ तंत्रज्ञानाला वाहिलेले विज्ञान आणि गणिताच्या भाषेत लिहिलेले अनेक प्रबंध, अहवाल आणि अभिलेख सापडतील ज्यावरून 'अपोलो-११'चे यान कसे तयार केले, त्याची एकंदर यात्रा कशी आखली गेली, अंतराळवीरांना कुठल्या कुठल्या चाचण्यांतून जावे लागले, वगैरे सर्व तांत्रिक माहिती मिळेल. या दुसऱ्या प्रकारच्या माहितीवरून कुठल्याही तंत्रसमृद्ध संस्कृतीला तशी अंतराळयात्रा आखता येईल. पुराणातील वर्णने फार तर पहिल्या प्रकारची आहेत, दुसऱ्या प्रकारची नाहीत. पुष्पक विमान तयार करायची नियमपुस्तिका (मॅन्युअल) अद्याप उपलब्ध नाही. वायव्यास्त्र, आग्नेयास्त्र वगैरे कसे बनवले जाते, याची कृती 'महाभारत' या महाकाव्यात सापडत नाही. सध्या उपलब्ध पौराणिक संदर्भांमधून केवळ इतकेच निदान करता येते की, ते लिहिणाऱ्यांची कल्पनाशक्ती अचाट होती; परंतु त्यापलीकडे जायला हवा असलेला पुरावा सध्यातरी उपलब्ध नाही. विज्ञानकथा का लिहाव्यात? विज्ञानकथा लिहिताना लेखकासमोर एक विशिष्ट हेतू असू शकेल. त्याला एखादी मनोवेधक वैज्ञानिक कल्पना वाचकांपर्यंत आणायची असेल; पण एखाद्या पाठ्यपुस्तकाच्या शैलीत नव्हे. उलट, ती कल्पना गोष्टीरूपाने मांडता आली तर वाचक ती सहज आत्मसात करू शकेल, अशी भावना लेखकाला प्रेरित करू शकेल. एखादी कडू गोळी गिळायला त्रास होतो; पण ती साखरेच्या आवरणात रंगीबेरंगी करून दिली, तर सहजगत्या घशाखाली उतरते. हे उदाहरण देण्यामागे विज्ञानाला 'कुरूप', 'कडू' म्हणण्याचा उद्देश नाही, तर त्याकडे पाहण्याचा सामान्यांचा दृष्टिकोन कसा असतो, त्यावर भर देण्याचा आहे. शाळेत ज्या अनाकर्षक तऱ्हेने गणित आणि विज्ञान हे विषय शिकवले जातात, त्यामुळे विज्ञानाबद्दल जनमानसात एक प्रकारची भीती वा अनास्था निर्माण झाली आहे. काही समीक्षकांच्या मते, असा एखादा दृष्टिकोन पुढे ठेवून केलेले लिखाण म्हणजे चांगले साहित्य नव्हे. मी त्यांना विचारतो की, एका दृष्टिकोनातून लिहिलेल्या साहित्याला आपण साहित्य मानावयास तयार नसाल, तर मग तुलसीदासांचे 'रामचरितमानस' किंवा संतवाङ्मय यांना काय म्हणणार आहात? या साहित्याला तुम्ही चांगले साहित्य म्हणणार नसाल; तर चांगल्या साहित्यासाठी तुमचे वेगळे मानदंड कोणते? पुढे जाऊन पूर्णपणे निर्हेतुक असे साहित्य असते का? गेले वर्षभर सगळ्या जगात कोव्हिडच्या विषाणूने थैमान घातले आणि बरेच नुकसान केले. एकप्रकारे आपण विज्ञानकथेत वर्णन केलेली स्थिती अनुभवत आहोत. वैज्ञानिक मार्गाने वैद्यकीय लस शोधणे, हाच सर्वमान्य उपाय ठरला. कोणत्याही धर्माची कर्मकांडे, फलज्योतिष यांचा उपयोग झाला नाही. उत्तम आणि निकृष्ट विज्ञानकथा कशा ओळखाव्यात? या प्रश्नाचे उत्तर देताना विज्ञानकथेच्या दर्जाचे भान ठेवले पाहिजे. सर्वच विज्ञानकथा भविष्यद्रष्ट्या नसतात. उत्कृष्टतेचे वेगवेगळे निकष लावले तर फारच कमी कथा त्यात उतरतील. उत्तम विज्ञानकथेच्या गाभ्यात जे काही विज्ञान असते, ते सध्याच्या माहितीप्रमाणे बिनचूक तर असतेच; पण भविष्यात ते कुठे गेलेले असेल याची पण माहिती देणारे असते. अर्थात, हे भविष्याचे आडाखे बिनचूक असतीलच, असे नाही. पण ते सध्याच्या माहितीशी विसंगत नसावे. हे आडाखे कितपत बिनचूक होते, ते भविष्यकाळ वर्तमानात पोहोचला की ठरवेलच. माझ्या लेखी विज्ञानकथेची क्षमता विज्ञान आणि समाज यांच्यातील परस्पर संबंधांवर ती किती भाष्य करते, यावरही अवलंबून असावी. आज असे अनेक वैज्ञानिक विषय आहेत. स्टेम सेल संशोधन, उपग्रहांतून टेहळणी, क्लोनिंग, अणुइंधनाचा वापर/ गैरवापर इत्यादी. त्यांचा समाजाशी घनिष्ट संबंध असतो. भविष्यातील चित्रे रेखाटताना विज्ञानकथाकार समाजाला काही वैज्ञानिक संशोधनातून उद्भवणाऱ्या धोक्यांपासून सावध करू शकतो. आता थोडक्यात, निकृष्ट दर्जाच्या विज्ञानकथा कशा असतात ते पाहू. विज्ञानकथेतले विज्ञान आजच्या विज्ञानाच्या कांकणभर पुढेच गेले असले तरी चालते, हे आधीच मान्य केले आहे; पण असे 'पुढे' गेलेले विज्ञान गोष्टीच्या कथानकात चर्चिले गेले असावे. म्हणजे, या 'नव्या' विज्ञानाची पार्श्वभूमी लेखकाच्या दृष्टिकोनातून वाचकांपर्यंत पोहोचते; पण पुष्कळ विज्ञानकथात विज्ञानाचे मूळ नियम कारण न देता हवे तसे बदलण्यात येतात. शेवटी आणखी एक मुद्दा! एखादी विज्ञानकथा व कादंबरी उत्तम वैज्ञानिक कल्पनेवर आधारित असूनही साहित्यिक गुणांच्या अभावामुळे (वाईट लेखनशैली, अपूर्ण स्वभावचित्र इत्यादी) निकृष्ट ठरेल. त्याउलट, विज्ञानात नापास झालेली कादंबरी साहित्यिक गुणांमुळे वाचनीय वाटेल. अशा स्थितीतही विज्ञानकथेचे निकष लावल्यास मी पहिल्या रचनेला दुसरीपेक्षा अव्वल स्थान देईन. (ऐतिहासिक कादंबऱ्यांच्या बाबतीतही मी असेच परीक्षण करेन. जरी साहित्यरचना म्हणून एखादी कादंबरी गाजली असेल; पण तिने इतिहासाशी प्रतारणा केली असेल, तर ऐतिहासिक कादंबरी म्हणून तिला कमी लेखले पाहिजे.) थोडक्यात, आपण जेव्हा विज्ञानसाहित्याचे मूल्यमापन करतो तेव्हा ज्या विज्ञानावर ते आधारलेले आहे ते पण तपासले पाहिजे. विज्ञानकथा आणि मी मी विज्ञानकथा लिहिण्यापूर्वी मराठीमध्ये विज्ञानकथा लिहिल्या गेल्या आहेत. अगदी १९१५ मध्ये 'मनोरंजन' मासिकात श्रीधर बाळकृष्ण रानडे यांची विज्ञानकथा प्रकाशित झाली होती. त्यानंतर त्या शतकाच्या पाचव्या आणि सहाव्या दशकात बरेच विज्ञानकथाकार तयार झाले. काहींनी स्वतःचे साहित्य निर्माण केले, तर काहींनी भाषांतरे केली होती. द. पां. खांबेटे, नारायण धारप, भा. रा. भागवत ही काही यातील नावे आहेत. सर्वच लेखकांची नावे मी देऊ शकत नाही; पण मराठीत विज्ञानकथेच्या उगमाबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. काही जण विचारतात, तुम्हाला विज्ञानकथा लिहायला वेळ कसा मिळतो? सूर असा असतो की, संशोधनाचे काम सोडून तुम्ही हे काय करीत आहात? माझे त्यांना सांगणे आहे की, विज्ञानकथा लिखाण हा माझा विरंगुळा आहे. विज्ञानकथा लिहिण्यासाठी वेळ कसा मिळवायचा, हा एक मुद्दा आहेच. दिवसाच्या चोवीस तासांतील प्रमुख वेळ आपल्या नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या कामासाठी द्यावा लागतो. शिवाय, झोप आणि जेवण्यासाठी व इतर आवश्यक गोष्टींसाठी वेळ देणे आवश्यक आहे. त्यातून थोडा वेळ मिळतो, तो मात्र आपण तसाच घालवतो. एका व्यवस्थापन विषयावरील व्याख्यानाची सुरुवात करताना अध्यापकाने बरोबर आणलेल्या बादलीत मोठे दगडधोंडे भरले. जेव्हा आता जास्त दगड मावत नाहीत, हे त्याच्या लक्षात आले; तेव्हा त्याने क्लासला विचारले, 'काय, बादली भरली?' क्लास उत्तरला, 'होय'. तेव्हा अध्यापक उत्तरला, 'चूक!' आणि त्याने बरोबर आणलेली वाळू बादलीत ओतली. त्याने विचारले, 'काय, बादली भरली?' 'नाही,' क्लास उत्तरला. 'बरोबर,' असे म्हणून त्याने बादलीत पाणी ओतून दाखवले. 'यातून काय बोध घ्यायचा,' त्याने विचारले. क्लास म्हणाला, 'तुमची मोठी कामे उरकली की, त्या दरम्यान असलेला मोकळा वेळ लहान कामासाठी वापरावा.' पुढे अध्यापकाने दुसऱ्या बादलीत आधी वाळू आणि पाणी भरले, तेव्हा त्यात दगडधोंड्यासाठी जागा राहिली नाही! तात्पर्य, तुमची लहान कामे उरकण्यात वेळ गेला, तर मोठी कामे करणार कधी? तेव्हा वेळेचे नियोजन महत्त्वाचे! कधी कधी असेपण होते. आपण विमानतळावर बसलेलो असतो आणि जाहीर करण्यात येते की, विमान सुटावयास दोन तासांचा उशीर आहे. यावेळी त्रागा करून घेऊ नका. माझा सल्ला आठवा. वही समोर ओढा आणि लिहायला लागा. आपणही विज्ञानकथा लिहू शकाल.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lyz9vB

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.