Type Here to Get Search Results !

धुळे-नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाचे तांडव, 'ही' भीती वाढली!

धुळे: हवामान विभागाने दर्शवलेला अवकाळी पावसाचा अंदाज आणि जिल्ह्यासाठी दुर्दैवाने खरा ठरला आहे. या दोन्ही जिल्ह्यातील बहुतांश भागाला अवकाळी पावसाने झोडपून काढले. अनेक भागांमध्ये धुमशान घालणाऱ्या या अवकाळी पावसाने उभी पिके आडवी केली आहेत. गेल्या चोवीस तासांपासून या जिल्ह्यांमध्ये सूर्यदर्शन झालेले नाही. थंडीचा ही प्रचंड कडाका जाणवतोय. बदललेल्या वातावरणामुळं करोनासह साथीच्या इतर आजारांचीही भीती वाढली आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात गेल्या १२ तासांपासून सर्वदूर पाऊस सुरू आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झालं आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. बुधवारी सकाळपासून धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. त्यानंतर या दोन्ही जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊसाने तांडव घातले. काल सायंकाळी सहा वाजल्यापासून आतापर्यंत मध्यम स्वरूपाच्या पावसाने विश्रांती घेतलेली नाही. पावसाची ही रिपरिप शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून जात आहे. त्यामुळे द्राक्षे, भात, भाजीपाला, काढणीला आलेला कापूस, तूर, मिरची, कांदा, हरभरा आणि फळ पिकाचे न भरून निघणारे नुकसान या अवकाळी पावसाने केले आहे. फळबागांच्या बहरावर याचा प्रतिकूल परिणाम होणार आहे. या पावसासोबत प्रचंड गारवाही निर्माण झाला आहे. पाऊस आणि प्रचंड गारवा यामुळे घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. बोचऱ्या गार थंडीमुळे तापमानाचा पारा देखील प्रचंड खाली आला आहे. आजारांची भीती वाढली अशा बेमोसमी वातावरणात करोनाची भीती अधिक दहशत निर्माण करणारी ठरतेय. पाऊस, बोचरी थंडी, गार वारे यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सर्दी-खोकला, ताप, संधिवाताच्या रुग्णांना होणारा त्रास यामुळे बळावेल अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. नागरिकांनी अशा विचित्र वातावरणापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सूर्यनमस्कार आणि योगासन वर भर द्यावा असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. हेही वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3GaznB5

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.