Type Here to Get Search Results !

धक्कादायक! तपास अधिकाऱ्यांची परमबीर सिंगांशी हातमिळवणी; सरकारी वकिलांना शंका

म. टा. प्रतिनिधी, ठाणे माजी पोलिस आयुक्त आणि काही पोलिस अधिकाऱ्यांसह २८ जणांविरुद्ध दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याविषयी या गुन्ह्यातील विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी गंभीर शंका उपस्थित केल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित तपास अधिकारी गुन्ह्याची माहिती आणि कागदपत्रांची मागणी करूनही देत नसल्याने हे प्रकरण निष्काळजीने हाताळले जात आहे किंवा तपास अधिकाऱ्यांनी आरोपींबरोबर हातमिळवणी केल्यामुळे ते माझ्याशी संपर्क करण्यास तयार नाहीत, अशी घरत यांना शंका असून याबाबत त्यांनी चौकशी करण्याची मागणी राज्याच्या गृह सचिवासह पोलिस महासंचालकांकडे केली आहे. घरत यांनीच ही माहिती दिली. मुंबईतील व्यावसायिक केतन तन्ना यांच्या तक्रारीनंतर परमबीर सिंग यांच्यासह इतरांविरुद्ध ३० जुलै रोजी ठाणे नगर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात सिंग यांच्याविरुद्ध ठाणे न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंटही काढले आहे. ठाणे पोलिस सिंग यांच्या मुंबई आणि चंडीगडमधील घरीही जाऊन आले. मात्र ते घरी नसल्याने घरावर वॉरंटची प्रत चिटकवण्यात आली. या प्रकरणाचा तपास ठाणे पोलिसांकडून करण्यात येत असला तरी या गुन्ह्यातील विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी तपास अधिकाऱ्याविषयी केलेल्या शंकेमुळे या प्रकरणाचा तपास संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. घरत यांनी गृह सचिव आणि पोलिस महासंचालकांना पत्र लिहिले असून या पत्रातूनच त्यांनी शंका उपस्थित केली आहे. विशेष सरकारी वकील म्हणून माझी सप्टेंबरमध्ये नियुक्ती झाल्यानंतर तपास अधिकाऱ्याने माझ्याशी संपर्क साधून भेट घेणे आवश्यक होते. शिवाय गुन्ह्याविषयी आणि तपासाची माहिती, जामीन अर्जासंबंधी कागदपत्रे मला द्यायला हवी होती. परंतु न्यायालयातील कर्मचाऱ्याकडे निरोप देऊनही संबंधित तपास अधिकाऱ्याने माझ्याशी कोणताही संपर्क साधला नाही. शिवाय माहितीही दिली नाही. न्यायालयातही तपास अधिकाऱ्याने माझ्याकडे दुर्लक्ष केल्याचे घरत यांचे म्हणणे आहे. कागदपत्रे देणे टाळले... तपास अधिकाऱ्याची असहकाराची भूमिका पाहता माझी नियुक्ती तपास अधिकाऱ्याला आवडली नसल्याचे दिसत आहे. जामीन अर्जावर युक्तिवाद करण्यासाठी मला कोणतीही कागदपत्रे मागणी करूनही आजपर्यंत न देणे, युक्तिवाद योग्यप्रकारे होऊ नये यासाठी गुन्ह्याविषयी माहिती न देणे यामधून तपास अधिकारी हे निष्काळजीने हे प्रकरण हाताळत आहेत किंवा तपास अधिकाऱ्यांनी आरोपींबरोबर हातमिळवणी केल्यामुळे ते माझ्याशी संपर्क करण्यास तयार नाहीत असा आरोप घरत यांनी केला आहे. याबाबत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्याकडून स्पष्टीकरण मागण्याची मागणी घरत यांनी केली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CUP1y9

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.