Type Here to Get Search Results !

मुंबईतील तरुणाने करोनात नोकरी गमावली आणि नंतरही झाला मोठा घात!

मुंबई : वरळीच्या बीडीडी चाळीत राहणाऱ्या एका तरूणाची करोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे नोकरी गेली. त्यामुळे सदर तरुणाने साठवलेल्या पैशातून एखादा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण येथेही दगाफटका झाला आणि कच्च्या तेलाच्या व्यवसायाच्या बहाण्याने या तरूणाची तब्बल सहा लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली. नोकरी गेली आणि व्यवसायात केलेली गुंतवणूकही गमावल्याने आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? असा प्रश्न या तरूणापुढे निर्माण झाला आहे. सिनेमाची ऑनलाइन तिकीट विक्री करणाऱ्या एका अॅपच्या कंपनीत नोकरी करणाऱ्या राकेश (बदललेले नाव) याची लॉकडाऊनमुळे नोकरी गेली. भावाच्या टेलरिंगच्या कामावर आणि नोकरीतून साठवलेल्या पैशातून राकेशच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. दुसरी नोकरी मिळत नसल्याने राकेश व्यवसाय करण्याच्या बेतात होता. त्याने ऑनलाइन व्यवसाय सुरू केला आणि अनेक ॲपवर नोंदणी केली होती. एका ॲपवर राकेश याला युके येथून एका तरुणीने संदेश पाठवला. दोघेही मोबाइल क्रमांक मिळाल्यावर एकमेकांशी चॅटिंग करू लागले. या दरम्यान राकेश याने आपल्या नोकरीबाबत सांगितलं असता या महिलेने कच्च्या तेलाच्या व्यवसायाबद्दल माहिती दिली. कच्चे तेल विकणारी एक कंपनी असून त्या कंपनीकडे हे तेल खरेदी करून परदेशात तेल पाठवल्यास मोठा फायदा होऊ शकतो, असं सांगून या महिलेने कच्चे तेल विकणाऱ्या कंपनीचा राकेशला संपर्क दिला. चांगला नफा मिळणार असल्याने राकेशने या व्यवसायात गुंतवणूक करायचं ठरवलं. त्याने कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क केला आणि सॅम्पल म्हणून एक लीटर कच्चे तेल मागवले. कंपनीच्या प्रतिनिधीने या तेलासाठी १ लाख रुपये आगाऊ म्हणून घेतले. तेलाचे सॅम्पल परस्पर परदेशात पाठवतो म्हणून सांगितले मात्र ते पाठवले नाही. परदेशातील कंपनीकडून हे तेल कोणत्या दर्जाचे आहे याचा अहवाल मागवण्यात आला. तेल कंपनीने अहवाल देताच परदेशातील कंपनीने राकेशकडे दिडशे लिटर तेलाची ऑर्डर दिली. दरम्यान, राकेशने हैद्राबाद येथील कंपनीला पाच लाख भरून ही ऑर्डर दिली. आधीचे एक लाख आणि नंतरचे पाच लाख इतकी रक्कम देऊनही परदेशी कंपनीचे कुणी भारतात आले नाही किंवा तेल कंपनीचाही काहीच पत्ता लागला नाही. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच राकेश याने वरळी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. याप्रकरणी आता पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wlujGg

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.