म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक भाजपच्या राष्ट्रीय सचिव व माजी मंत्री पंकजा मुंडेंनी आपल्या दौऱ्यात नाशिकचे पालकमत्री छगन भुजबळ यांच्यावर जाहीर भाषणात स्तुतीसुमने उधळल्यानंतर भुजबळांचे कट्टर विरोधक असलेल्या शिवसेना आमदार यांच्या घरी भेट दिली. जिल्ह्यात सध्या कांदे आणि भुजबळांमध्ये संघर्ष सुरू असताना मुंडेंनी कादे यांच्या घरी सदिच्छा भेट देत राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. मुंडे तीन दिवसांपासून शहरात तळ ठोकून आहेत. मुंडे यांच्या उपस्थितीत सोमवारी संदर्भसेवा हॉस्पिटलच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी मुंडे व छगन भुजबळ एकाच मंचावर आले होते. यावेळी मुंडेंनी आपल्या भाषणात भुजबळांच्या ज्येष्ठत्वाचा गौरव करत, ते आपल्याला वडिलांसमान असल्याचे सांगितले होते. यासोबतच नामको बँकेसह सिन्नरच्या कार्यक्रमात मुंडेंनी भुजबळांचे कौतुक केले. मुंडे यांचे वडील स्व. गोपीनाथ मुंडे आणि भुजबळ यांचा ओबीसींसाठी राहिला आहे. त्यामुळे हा समान धागा पकडत त्यांनी भुजबळांवर स्तुतीसुमने उधळली. त्यामुळे भुजबळांच्या गोटात समाधानाचे वातावरण होते. परंतु, मुंडे यांनी भुजबळांचे कट्टर विरोध असलेल्या शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या घरी जाऊन त्यांची देखील भेट घेतली. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भाजप आणि शिवसेनेत सध्या संघर्षाचे वातावरण असतांना मुंडे यांनी कांदेंच्या घरी सदिच्छा भेट देत वेगळाच राजकीय संकेत देण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी मुंडेंनी कांदे यांच्यासोबतच विविध विषयांवर चर्चा केल्याने या दोघांमध्ये नेमकी कशावर चर्चा झाली, याची दिवसभर शहरात चर्चा होती. शिष्टाई की बळ? 'डीसीपीसी'चा निधी वाटपावरून सध्या भुजबळ आणि कांदे यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे. भुजबळांच्या विरोधात कांदे यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेत, निधीवरून आत्मदहनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंडे आणि कांदे यांच्यात भुजबळ-कांदे वादावर चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नांदगाव मतदारसंघावरून भुजबळ आणि कांदे यांच्या संघर्षाची राज्यभर चर्चा आहे. त्यामुळे मुंडेंनी या भेटीत दोघामंध्ये शिष्टाई करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. भुजबळांविरोधात कांदेंना बळ देण्याचा प्रयत्न केला अशी चर्चा दोघांच्या समर्थकांमध्ये होती.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3bze4vJ