Type Here to Get Search Results !

'त्या' व्यापाऱ्यांवर बहिष्कार टाकू; कांदा आयातप्रकरणी उत्पादक संघटनेचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: प्रतिकूल हवामान आणि बोगस बियाण्यांसह अनेक घटकांमुळे लाल कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे दीर्घकाळापासून साठवणूक करण्यात आलेला उन्हाळी कांदाही निम्म्यापेक्षा अधिक प्रमाणात खराब झाला आहे. यामुळे उन्हाळी व नवीन लाल कांद्याचे बाजारभाव वाढण्याची चिन्हे असतानाच केंद्राने इराणसह इतर देशांमधून कांदा आयातीस परवानगी दिली आहे. मुंबईसह जागोजागचे आयातदार हा कांदा आयात करू लागल्याने स्थानिक कांदा उत्पादकांना मोठा फटका बसू लागला आहे. या पार्श्वभूमीवर परदेशी कांद्याचे आयातदार, आडतदार आणि व्यापाऱ्यांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले की, 'गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने बोगस बियाणे, प्रतिकूल हवामान, अतिवृष्टी, ढगफुटीसदृश पाऊस आदी कारणांनी खरिपाच्या लाल कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. सहा ते सात महिन्यांपासून साठवणूक केलेला उन्हाळी कांदा निम्म्यापेक्षाही अधिक सडला आहे. यामुळे उन्हाळी कांद्यासह नवीन लाल कांद्याचेही बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. मात्र केंद्र सरकारने इराण, तुर्की, अफगाणिस्थानसह इतर देशांतील कांदा आयात करण्यासाठी परवानगी दिली आहे. यामुळे राज्यातील काही आयातदारांनी कांदा आयात केल्याने स्थानिक शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव कमी मिळत आहे. शेतकऱ्यांचा कांदा ५० रुपये प्रतिकिलोऐवजी सरासरी २२ ते २५ रुपयांवर आला आहे. परिणामी राज्यातील कांदा उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.' या पार्श्वभूमीवर राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने भूमिका घेत परदेशी कांदा आयात करणाऱ्या आडते व्यापारी व आयातदारांची यादी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. संबंधित व्यापाऱ्यांना भविष्यात एकाही कांदा उत्पादकाने कांदा देऊ नये, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. - - - कांदा उत्पादकांना कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी शासकीय धोरणांच्या अडचणींना सातत्याने सामोरे जावे लागत आहे. केंद्राने आता परदेशी कांद्याच्या आयातीस परवानगी दिल्याने स्थानिक कांदा उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. परदेशी कांदा आयात करणाऱ्या व्यापारी-अडतदारांना भविष्यात कांदा पुरवू नये, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात येत आहे. - भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना - -


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3n6QLQx

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.