Type Here to Get Search Results !

कुटुंबासह शेतात काम करणाऱ्या महिलेवर अचानक बिबट्याने केला हल्ला

: शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला करत जखमी केलं आहे. दर्यापूर तालुक्यातील धामणा येथे ही घटना घडली असून मालू सुरेश चव्हाण (५५) रा. तोंगलाबाद असं जखमी महिलेचं नाव आहे. मालू चव्हाण ही महिला घरच्या शेतात पती, मुलगा, सून व नातवासह कापूस वेचत होती. दरम्यान तिच्यावर बिबट्याने हल्ला करत तिच्या पायाचा लचका तोडला. तिने आरडाओरड सुरू केल्यानंतर शेतात काम करत असलेल्या कुटुंबियांनी तिच्याकडे धाव घेतली. त्यावेळी हल्ला करणारा बिबट्या त्यांच्या नजरेस पडला. गर्दी जमल्यानंतर बिबट्या तिथून पळून गेला. कुटुंबियांनी जखमी मालू चव्हाण यांना त्वरित गावातील आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी आणलं आणि तेथून पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुरेश चव्हाण यांचे शेत धामणा परिसरात चंद्रभागा नदीच्या किनारी असून तेथे घनदाट झाडांमध्ये बिबट्या लपला होता. तोंगलाबादच्या पोलीस पाटील ललिता काळे यांनी वन विभाग व तहसीलदारांना याबाबत माहिती दिली. वन विभागाचे वनपाल एन. बी. सोळंके यांनी जखमी रुग्णाची भेट घेवून पंचनामा केला व नातेवाईकांची चौकशी केली. पुढील माहितीकरता ते तोंगलाबाद परिसरातील शेतात गेले असता, त्यांना बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आल्याचे त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी करून दवंडीच्या माध्यमातून तोंगलाबाद परिसरातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वन विभागाने या बिबट्याला पकडावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qoMOZo

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.