Type Here to Get Search Results !

३६ वर्षे जुना प्रश्न अखेर मार्गी; पंढरपूरच्या मंदिरातील सोन्या-चांदीचे दागिने वितळवले जाणार

सूर्यकांत आसबे । देशभरातील गोरगरीब भाविकांनी विठुरायाला अर्पण केलेले लहान मोठे सोन्या-चांदीने दागिने वितळविण्यासाठी परवानगी राज्य सरकारने आता दिली आहे. गेल्या ३६ वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि अत्यंत जोखमीचा प्रश्न मार्गी लागला आहे. गोरगरीब भाविकांनी अर्पण केलेले हे लहान दागिने देवाला वापरता येत नसल्यामुळे गेली वर्षानुवर्षे हे पोत्यात बांधून खजिन्यात ठेवण्यात आले होते. या लहान दागिन्यांमध्ये २८ किलो सोने आणि ९९६ किलो चांदीचे दागिने आहेत. आता राज्य सरकारने दिलेल्या परवानगीनुसार औरंगाबाद येथील विधी व न्याय विभागाचे सहसचिव सुभाष कऱ्हाळे यांच्या उपस्थितीत तीन मंदिर समिती सदस्य आणि मंदिराचे कार्यकारी अधिकारी अशा पाच जणांची समितीच्या मार्गदर्शनाखाली हे सोने-चांदी वितळण्याचे काम मुंबई येथील केंद्र सरकारच्या रिफायनरी मध्ये केले जाणार आहे. यासाठी राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सध्या देवाकडे असलेल्या २८ किलो सोन्यापैकी ९ किलो सोन्याचे दागिने देवाला वापरता येण्यासारखे असल्यामुळे ते ठेवले जाणार असून १९ किलो सोने वितळविण्यासाठी येणार आहेत. तसेच एकूण ९९६ किलो चांदीपैकी ५७१ किलो चांदीचा वापर देवासाठी केला जाणार असल्यामुळे ४२५ किलो चांदी मिळविण्यास परवानगी देण्यात आली आहे. वाचा: कार्तिकी यात्रेनंतर वितळविण्यात येणारे सोने आणि चांदीच्या दागिन्यातील दोरे, खडे, हिरे आणि मानके हे पाच जणांच्या समितीच्या देखरेखीखाली वेगळे केले जाणार असून व्यवस्थित ठेवले जाणार आहेत. उरलेले सोने आणि चांदी यांचा विमा उतरवून सर्व चोख सुरक्षाव्यवस्थेत मुंबई येथे वितळविण्यासाठी नेली जाणार आहेत. सुरुवातीला सर्व सोने आणि चांदी वितळवून त्याचे दोन-दोन सॅम्पल तुकडे बाजूला काढले जाऊन मग सर्व सोने-चांदीचे शुद्धीकरण केले जाणार आहे. शासनाच्या आदेशानुसार या दागिन्यांमधून निघणाऱ्या शुद्ध सोने आणि चांदीच्या विटा बनविण्यात येऊन त्या मंदिर समितीकडे सुपूर्द केल्या जाणार आहेत. यासाठी मंदिर समितीच्या सदस्यांची निवड आणि सोने वितळविण्यासाठीची तारीख मंदिर समितीच्या बैठकीत केली जाणार आहे. राज्य सरकारने नेमलेले सहसचिव कऱ्हाळे यांना दहा दिवसांसाठी मंदिराकडे नियुक्त केले जाणार असल्यामुळे आता कार्तिकी यात्रेनंतर तातडीने ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यामुळे आता गोरगरीब भाविकांनी श्रद्धेने आपल्या लाडक्या विठुरायाला अर्पण केलेले सोन्या चांदीच्या वस्तू विटांच्या रूपात देवाच्या खजिन्यात कायमस्वरूपी राहणार आहेत. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30iSnxl

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.