Type Here to Get Search Results !

रिकाम्या धावणाऱ्या एसी लोकल पाहून प्रवाशांचा पारा चढला!

म. टा. प्रतिनिधी, रेल्वे मंडळाच्या निर्णय विलंबामुळे वातानुकूलित लोकलबाबत रेल्वे प्रवाशांच्या मनात असंतोष वाढत आहे. दिवाळीनंतर सुरू झालेली कार्यालये आणि एसटी संपामुळे प्रवाशांचा आलेला भार यामुळे गर्दीच्या वेळेत सामान्य लोकल पूर्ण भरून धावत आहेत. याच वेळेत धावणाऱ्या वातानुकूलित लोकल मात्र रिकाम्या जात असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. वातानुकूलित लोकलचे भाडेदर कमी करण्याची आग्रही मागणी होत आहे. मुंबई आणि उपनगरात पहिली लसमात्रा घेतलेल्या प्रवाशांचे प्रमाण मोठे आहे. मात्र लोकल प्रवासाकरीता दोन लसमात्रा आणि त्यानंतर १४ दिवस अशी अट आहे. यामुळे रेल्वे प्रवास शक्य नसल्याने एसटीचा आधार होता. एसटी संपामुळे प्रवाशांची पावले रेल्वे आणि अन्य वाहतूक साधनाकडे वळले आहेत. डिसेंबर २०१७ मध्ये पहिली वातानुकूलित लोकल धावली. त्यावेळी सामान्य लोकल रद्द करून त्या जागी वातानुकूलित लोकल चालवण्यात आल्या. सामान्य लोकल फेऱ्यांच्या वेळेत वातानुकूलित लोकल धावत असल्याने सर्वसामान्य प्रवाशांचा त्यावर राग आहे. प्रथम दर्जा भाडेदरापेक्षाही एसी लोकलचे तिकीट दर जास्त असल्याने सर्वसामान्यांना परवडणे शक्य नाही. या लोकलचे तिकीट दर कमी करण्याचा निर्णय होईपर्यंत या लोकल प्रवासी सेवेतून हद्दपार कराव्या. त्या जागी सामान्य लोकल फेऱ्या सुरू कराव्यात. तिकीट दर कमी केल्याचा निर्णय झाल्यानंतर वातानुकूलित गाड्या सेवेत दाखल कराव्या. गर्दी वाढत असताना रिकाम्या वातानुकूलित लोकल चालवण्यापेक्षा या लोकलचा काय तो सोक्षमोक्ष लावण्यात यावा, अशी मागणी प्रवासी संघटनांची आहे. रेल्वे मंडळाच्या निर्णयाची प्रतीक्षा रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांनी मुंबईचा दौरा केला. लोकलमध्ये त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला. या वेळी प्रवाशांनी त्यांना अडचणी सांगितल्या. रेल्वे मंत्रालयाचे रेल्वे मंत्र्यांनंतरचे सर्वोच्च अधिकारी असलेले रेल्वे मंडळाचे अध्यक्ष यांनी केवळ आश्वासनावर प्रवाशांची बोळवण केली. मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवासी सर्व्हे रेल्वे मंडळाकडे पाठवला. रेल्वे मंडळ तिकीट दरांबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत चढ्या दरानेच वातानुकूलित लोकलचे तिकीट उपलब्ध होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30hOQQb

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.