सोलापूरः राज्यात करोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात येत आहे. लसीकरणातही महाराष्ट्र आघाडीवर आहे. नागरिकांनी लस घेण्यासाठी पुढे यावे, यासाठी सरकारकडून जनजागृती करण्यात येते. मात्र, अजूनही ग्रामीण भागात करोना लसीबाबत साशंकता असल्याचं दिसून येते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. जिल्ह्यातील हा व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येत असून एक वृद्ध व्यक्ती लस घेण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळतंय सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक वृद्ध भितीपोटी लस घेण्यास नकार देत आहे. लस देण्यासाठी आलेलं आरोग्य कर्मचारी सर्वतोपरी या वृद्ध व्यक्तीला लस घेण्याचे फायदे समजून सांगत आहेत. मात्र, या व्यक्ती त्यांचं ऐकूनच घ्यायला तयार नसल्याचं दिसत आहे. आम्हाला लस घ्यायचीच नाहीये असं तो व्यक्ती आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगत आहे. त्यावर कर्मचारी लसीकरणाचे सर्टिफिकेट नसेल तर कुठेच जाऊ देत नाही, मतदानही करता येणार नाही, असं म्हणत त्याची समजूत काढत आहेत. त्यावर तो पाकिस्तानात जाऊन राहिन पण लस घेणार नाही, असं उत्तर त्यांनी दिल्याचं व्हिडिओत दिसत आहे. वाचाः तसंच, स्टॅम्पवर लिहून द्या मग घेतो लस, लस घेऊन आमच्या घरातील कोणी मेलं तर जबाबदार तुम्ही राहणार व माझ्या परिवाराला सांभाळाल असं स्टॅम्प पेपरवर लिहून द्या, तरच लस घेतो, असं म्हणत लस घेण्यास टाळाटाळ करताना दिसत आहे. तसंच, लस घेऊन गावातील चार माणसं मेल्याचंही ते आरोग्य कर्मचार्यांना सांगताना दिसत आहेत. यावर आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांची समजूत घालण्याचा पुरेपुर प्रयत्न केला आहे. गावातील माणसं लस घेऊन नाही तर हार्ट अॅटेकने गेले आहेत, असं सांगण्याचा कर्मचारी प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांचं काहीही ऐकून न घेता या वृद्ध व्यक्तीने लस घेणार नसल्याचं त्यांना ठणकावून सांगितलं आहे. वाचाः दरम्यान, हा व्हिडिओ सोलापूर जिल्ह्यातील असून पुढे या व्यक्तींने लस घेतली का?, याबाबत मात्र अद्याप माहिती मिळाली नाहीये. मात्र, ग्रामीण भागात अजूनही करोनावरील लसीबाबत अज्ञान असल्याचं चित्र आहे. प्रशासनाने यावर तात्काळ पावलं उचलून जनजागृतीसाठी अभियान राबवण्याची गरज आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZDcbvj