मुंबईः कोर्डिलिया क्रुझ प्रकरणात आर्यन खानला अटक केली होती. त्यानंतर गुरुवारी आर्यन खानसह आरबाझ मर्चंट व मुनमुन धामेचाला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला होता. त्यानुसार आज आर्यनची ऑर्थर रोड कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. त्यापाठोपाठच आर्यन खानला अमलीपदार्थ पुरवत असल्याचा आरोप असलेल्या अचित कुमार यालाही विशेष एनडीपीएस कोर्टानं जामीन मंजुर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खान, अरबाझ मर्चंट व मुनमुन धामेचा यांना जमीन मंजुर केल्यानंतर या प्रकरणातील एनसीबीने अटक केलेल्या एकूण २० आरोपींपैकी १० आरोपींना जामीन देण्यात आला आहे. कोर्डिलिया क्रूझवर रेव्ह पार्टीचे आयोजन केल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या कंपनीच्या चौघांनाही विशेष एनडीपीएस कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. केनप्लस ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक समीर सेहगल, गोपालजी आनंद, कर्मचारी मानव सिंघल व भास्कर अरोरा यांना विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी एनडीपीएस कोर्टाचे विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी क्रूझवरील परतीच्या प्रवासानंतर ४ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आलेल्या अविन साहू व मनीष राजगढीया यांना जामीन मंजूर केला होता. वाचाः तसंच, या प्रकरणात गोमित चोप्रा या आणखी एका आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणात मध्यम प्रमाणात अमलीपदार्थसह अटक झालेला आणि जामीन मिळालेला गोमित चोप्रा हा पहिलाच आरोपी आहे. गोमित चोप्रा हा ३ ऑक्टोबर रोजी आर्यन खानसह आठ जणांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपी क्रमांक-७ आहे. अटकेत असलेल्या दोन नायजेरियन नागरिकांनी एमडीएमए पिल्स आणि कोकेन हे अमलीपदार्थ अब्दुल कादिर शेख याला पुरवले, शेखने ते मोहक जस्वालला पुरवले आणि मोहकने ते गोमितला पुरवले, असा एनसीबीचा आरोप आहे. वाचाः
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3bmoWgg