सांगली : बंदसाठी एसटी कामगारांना फूस लावून आटपाडी बस आगाराचे गेट बंद केल्याबद्दल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह ७० जणांवर आटपाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आमदार पडळकर यांनी एसटी कर्मचारी आणि कार्यकर्त्यांसह शनिवारी सायंकाळी आटपाडी एसटी आगाराचे गेट बंद केले होते. आटपाडी एसटी आगारात शनिवारी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. त्यावेळी आमदार पडळकर यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलन तीव्र करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यानंतर काही कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी एसटी आगाराचे गेट बंद करून एसटीची अडवणूक केली. याबाबत पोलिसांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह एकूण ७० एसटी कामगारांवर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यावर आता पडळकर चौकशीसाठी कसे सामोर जातात आणि यातून काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. खरंतर, विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यामुळे एकही बस आगारातून निघाली नव्हती. ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांचेही हाल होत होते. अशात सरकारने मागण्या मान्य केल्यामुळे अखेर संप मागे घेण्यात आला असून आता वाहतूकहू सुरळीत आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jT7Awe