Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पूरग्रस्तांना आश्वासन, काय म्हणाले वाचा सविस्तर

सांगली : 'राज्यावर संकटांची मालिका सुरू आहे. यातून आपण मार्ग काढणारच असा मला आत्मविश्वास आहे. तातडीच्या मदतीसाठी अंदाज घेण्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी कठोर निर्णय घ्यावे लागतील. यासाठी तुमचे सहकार्य अपेक्षित आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जे जे शक्य आहे ते ते सर्व सरकार करणार आहे. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही,' अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भिलवडी (ता. पलूस) येथील पूरग्रस्तांना दिली. भिलवडी परिसरात पुराणे झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते नागरिकांशी संवाद साधत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी अकराच्या सुमारास भिलवडी येथे पोहोचले. यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांकडून पुराने झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. परिसरातील पूरग्रस्तांनी मागण्यांचे प्रातिनिधिक निवेदन मुख्यमंत्र्यांकडे दिले. पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान मिळावे. सोसायटींकडून घेतलेले पीक कर्ज माफ करावे. लाईट बिल माफ करावे. नदीकाठी पूरसंरक्षक भिंत बांधावी. नदीवर नवीन पूल बांधावा. व्यापारी व्यवसायिकांना नुकसानभरपाई मिळावी, तसेच पुराने बाधित होणाऱ्या कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. पूरग्रस्तांच्या भावना जाणून घेतल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, 'राज्यावर सध्या संकटांची मालिका कोसळत आहे. यातून आपण यशस्वीपणे मार्ग काढणार असा मला आत्मविश्वास आहे. तातडीची मदत देण्यासाठी राज्य सरकारकडून नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू आहे. हजारो कोटी रुपयांचे पॅकेज केवळ जाहीर करण्याचे थोतांड मला जमत नाही. लवकरच तातडीची मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचेल. काही ठिकाणी कायमस्वरूपी उपायांची अंमलबजावणी करावी लागेल. यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतील.' 'वारंवार पुराचा सामना करावा लागणाऱ्या लोकांना पुनर्वसनाची तयारी ठेवायला लागेल. यासाठी मला तुमचे सहकार्य अपेक्षित आहे. सरकार तुमच्या हिताचे निर्णय घेईल. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जे जे शक्य आहे ते ते सर्व सरकार करणार आहे. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही.' यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांकडून मास्क वापरण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान भिलवडी येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यात अनेकांच्या तोंडावर मास्क नव्हते. हा प्रकार लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना मास्क वापरण्याचे आवाहन केले. करोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे मास्क वापरा आणि गर्दी टाळा असे त्यांनी सांगितले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fnVhWy

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.