Type Here to Get Search Results !

मोबाईल चार्जरवरील रक्त आरोपींपर्यंत घेऊन गेलं; महिलेच्या खून प्रकरणात खळबळजनक खुलासा!

: तासगाव तालुक्यातील धामणी येथे २२ जुलै रोजी झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. शालुबाई पांडुरंग पाटील (वय ७९) या वृद्धेचा खून करून तिचे दागिने लंपास करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. अटकेतील तीनही गुन्हेगार सराईत असून, कोल्हापुरातील कळंबा जेलमध्ये शिक्षा भोगताना त्यांची ओळख झाली होती. खुनानंतर घटनास्थळी कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसताना मोबाईल चार्जरवरील रक्ताच्या डागांवरून पोलिस आरोपींपर्यंत पोहोचले. सुनील विठ्ठल तडसरे ( वय ३९, रा. बुधगाव), जीवन उर्फ बंटी नामदेव कांबळे ( वय ३२, रा. रेवले, ता. पाटण) आणि रवींद्र जगन्नाथ सुर्वे (वय ४७, रा. धामणी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. यातील तडसरे याने यापूर्वी तब्बल ४२ गुन्हे केले आहेत. जीवन कांबळे याच्यावर २७, तर सुर्वे याच्यावर चार गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, तासगाव तालुक्यातील धामणी येथे शहाजी पांडुरंग पाटील यांच्या शेतातील बंगल्यात २२ जुलै रोजी त्यांच्या आई शालुबाई यांचा मृतदेह आढळला होता. या बंगल्यात वयोवृद्ध शालूबाई या एकट्याच राहत होत्या. त्यांची दोन्ही मुले गलाई व्यवसायानिमित्त तामिळनाडू राज्यात राहतात. शालूबाई या अंगावर नेहमी दहा ते पंधरा तोळे सोने घालून फिरत होत्या. श्रीमंतीचे प्रदर्शन करणे त्यांच्या जीवावर बेतले. चोरट्यांनी दोन दिवस बंगल्याची रेकी केली. २१ जुलैच्या मध्यरात्री चोरट्यांनी बंगल्यात घुसून झोपेत असलेल्या शालूबाई यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचे ३ लाख रुपयांचे दागिने चोरून पलायन केले. ही घटना दुसऱ्या दिवशी उघडकीस आली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. या गुन्ह्याच्या तपासासाठी एकूण पाच पथके तैनात केली होती. गुन्ह्याचा तपास करताना संशयित तडसरे याच्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तडसरे याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान त्याचा साथीदार रवींद्र सुर्वे याचे नाव समोर आले. पोलिसांनी सुर्वेच्या घराची झडती घेतली असता, रक्ताचे डाग लागलेला मोबाइल चार्जर सापडला. चार्जरवरील रक्ताचे नमुने आणि वृद्धेच्या रक्ताचे नमुने जुळल्याने गुन्ह्याचा उलगडा झाला. सुर्वे यानेच शालुबाई यांच्याकडे भरपूर दागिने असल्याची माहिती तडसरे आणि जीवन कांबळे या दोघांना दिली होती. तिघांनी कट रचून वृद्धेचा खून व दागिन्यांची लूट केल्याची कबुली दिली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव जाधव, संजीव झाडे यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास केला. बुटाच्या लेसने गळा आवळला बंगल्यात शालूबाई एकट्याच राहत असल्याची माहिती धामणीतील सुर्वे याने दोन्ही साथीदारांना दिली. १९ जुलै पासून या तिघांनी बंगल्याची रेकी केली. २१ जुलैच्या मध्यरात्री ते बंगल्यात घुसले. बुटाच्या लेसने त्यांनी झोपेत असलेल्या वृद्धेचा गळा आवळला. झटापटीत आलेल्या रक्ताचे डाग आरोपीच्या मोबाईल चार्जरवर पडले होते. यानंतर वृद्धेच्या अंगावरील तीन लाख रुपयांचे दागिने घेऊन ते पळाले. कळंबा जेलमध्ये आरोपींची मैत्री खून करून लूटमार करणारे तिघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. कोल्हापुरातील कळंबा कारागृहात त्यांची ओळख झाली होती. कारागृहातून बाहेर येताच तिघांनी टोळी बनवून गुन्हे करण्यास सुरुवात केली. धामणी येथील वृद्धेच्या खुनासह आणखी तीन गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AyCtMb

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.