Type Here to Get Search Results !

निवडणुकांसाठी अनोखी आयडिया; गटारीनिमित्त शिवसेनेकडून अल्प दरात चिकन

विरारः अवघ्या काही दिवसांमध्ये श्रावण महिना सुरू होईल. श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी खवय्यांना वेध लागतात ते गटारी अमावस्येचे. गटारी अमावस्येची संधी साधत विरार शिवसेनेनं निवडणुकांसाठी अनोखी शक्कल लढवली आहे. गटारीनिमित्त विरारमध्ये अल्प दरात एक किलो चिकनचे वाटप करण्यात येत आहे. वसई- विरार महानगरपालिकेची निवडणूक सध्या जवळ आली आहे. त्यामुळं निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. काही राजकीय पक्षांकडून नागरिकांसाठी लसीकरण केंद्रांचे उद्घाटन होत आहे. तर, काहींनी आपल्या मतदारसंघातून पूरग्रस्तांसाठी मदत पाठवली आहे. मात्र, विरार शिवसेनेच्या जाहीर केलेल्या या आगळ्या-वेगळ्या जाहीरातीची शहरात उलटसुलट चर्चा रंगली आहे. निवडणुकांच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष मतदार संघात वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतात. किंवा, मतदारांसाठी सवलतींच्या दरात वस्तूंचे वाटप करण्यात. पण शिवसेनेनं पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही वेगळी शक्कल लढविली असून शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. विरारच्या साईनाथ नगर शाखेच्या वतीने हे चिकन अल्प दरात मिळणार आहे. चिकन मिळवण्यासाठी नागरिकांना आगाऊ नोंदणी करावी लागणार असून रविवारी सकाळी ९ ते ११ या वेळातच ही संधी उपलब्ध असणार आहे. सध्या चिकनचा दर प्रतिकिलो २३० ते २४० रुपये आहे. मात्र, शिवसेनेकडून रविवारी चिकन १८० रुपयांना देण्यात येणार आहे. तसे फलकही शिवसेनेनं शहरात लावलं आहे. दरम्यान, यंदा आषाढी अमावस्या ८ ऑगस्टला म्हणजेच रविवारी आहे. यालाच आजकालच्या भाषेत गटारी असं म्हटलं जातं. श्रावण महिना सुरु झाला की पुढील काही दिवस मांसाहार करता येत नाही. श्रावण संपला की लगेच गणपतीचे वेध लागतात. त्यामुळे साधारणपणे दीड महिन्यानंतरच मासांहार करता येतो. म्हणून श्रावण महिना सुरू होण्याआधी खवय्ये साजरी करतात.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iuiGYm

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.