Type Here to Get Search Results !

'सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येऊ शकते, पण...'

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः 'करोना संसर्गाची तिसरी लाट येणार का, हा प्रश्न सध्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून १० ते १५ ऑक्टोबरपर्यंत तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल; मात्र ही लाट सौम्य स्वरूपाची असेल,' अशी शक्यता 'टास्क फोर्स'चे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी वर्तवली आहे. 'विज्ञान भारती'च्या कोकण प्रांतातर्फे आयोजित व्याख्यानमालेत 'महाराष्ट्र टाइम्स'च्या फेसबुक लाइव्ह कार्यक्रमातून त्यांनी करोना काळामधील आरोग्यव्यवस्थेने पेललेली आव्हाने, व्यवस्थेतील त्रुटी अशा वेगवेगळ्या मुद्द्यांसंदर्भात मार्गदर्शन केले. 'महाराष्ट्र टाइम्स' या व्याख्यानमालेचा माध्यमप्रायोजक आहे. पत्रकार संतोष आंधळे यांनी घेतलेल्या या मुलाखतीमध्ये डॉ. ओक यांनी तिसरी लाट येण्यापूर्वी राज्यातील अधिकाधिक लोकांचे लसीकरण व्हायला हवे. मास्कचा वापर कटाक्षाने करायला हवा, असा आग्रह त्यांनी यावेळी व्यक्त केला. तिसऱ्या लाटेसंदर्भात भाष्य करताना त्यांनी, 'आयुष्यात अपेक्षा आणि वास्तव यातील दरीला अनेकदा सामोरे जावे लागते,' असे सांगत त्यांनी याची कारणमीमांसा केली. 'आरोग्यव्यवस्था सक्षम असलेल्या इंग्लड, ब्राझील, जर्मनी आणि अमेरिका या देशांमध्ये आज रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. तिथे लसीकरण झालेल्या नागरिकांची संख्या ५० टक्क्यांहून अधिक होती. तरीही अमेरिकेमध्ये प्रतिदिवस किमान एक लाख रुग्णांची नोंद होत आहे. भारतात लसीकरणाचा आकडा धापा टाकत आहे, अशा परिस्थितीत देशात तिसरी लाट येणार नाही, हे दिवास्वप्न पाहिल्यासारखे होईल,' असे डॉ. ओक यांनी सांगितले. येणाऱ्या लाटेचा प्रतिबंध करण्यासाठी 'प्रतिकूल तेच खरे' हे डोक्यात ठसवून अनुकूल परिणाम मिळण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, तिसरी लाट दुसऱ्या लाटेइतकी इतकी प्रखर असणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. लाटेच्या तीव्रतेचे निकष सांगताना डॉ. ओक म्हणाले की, विषाणूची संसर्गक्षमता तसेच मानवी शरीरावर हल्ला करण्याची असलेली तयारी यावर साथीच्या लाटांची तीव्रता अवलंबून असते. पाश्चात्य देशांमध्ये आता डेल्टाचा प्रादुर्भाव वाढला आहे. आपल्याकडे हा डेल्टा आधीपासून ठाण मांडून होता. त्यामुळेच लाट आली, तरी ती भीषण ठरणार नाही. ८० ते ८५ टक्के लोकांना घरांमध्ये उपचार देऊ शकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. टास्क फोर्समध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक परिमाणांना स्थान नाही. वैद्यकीयदृष्ट्या योग्य आहे, तेच कोणतीही भीड न बाळगता राज्य सरकारला कळवले जाते. एखाद्या भूभागात रोज आणि आठवड्यामध्ये रुग्णांची संख्या किती आहे; आयसीयूमध्ये जाणाऱ्या, मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या किती आहे, दाटीवाटीने निर्माण झालेल्या लोकसंख्येच्या प्रमाणासह त्या भागातील लसीकरण असा एकत्रित विचार करून निर्बंध लावण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात, याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधले. पूरग्रस्त जिल्ह्यांत लसीकरण परिस्थिती चिंताजनक असलेल्या ११ जिल्ह्यांसह करोनाचे प्रमाण वाढलेल्या पूरग्रस्त भागांमध्ये लशींच्या अतिरिक्त मात्रांचा साठा देण्यात येणार आहे. येथील व्यक्तींना प्राधान्याने लस द्यावी, अशी मागणी टास्क फोर्सने सरकारकडे केली होती. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मोठ्या संख्येने लससाठा उपलब्ध होणार आहे, असा विश्वास डॉ. ओक यांनी व्यक्त केला. मुलांना तीव्र संसर्ग नाही मुंबईतील सिरो सर्वेक्षणामध्ये अनेक लहान मुलांच्या रक्तामध्ये अॅण्टीबॉडी दिसून आल्या. याचा अर्थ अनेक मुले ही करोना संसर्गाच्या संपर्कात आलेली आहेत. त्याामुळे तिसरी लाट आली, तरी मुलांना गंभीर स्वरूपाचा त्रास होणार नाही, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. अंतराचे निकष बदलले कोव्हिशील्ड लशीच्या दोन मात्रांमधील अंतर तीन वेळा बदलले. अनेकांच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये अॅण्टीबॉडीच्या गुणवत्तेवर हे निर्देश देण्यात आले. काही जणांना लशीची दुसरी मात्रा देण्यापूर्वी पुन्हा संसर्ग झाला. कमी व्यक्तींना दोन्ही मात्रा की अधिक व्यक्तींना किमान एक मात्रा असा व्यावहारिक दृष्टिकोनही त्यात होता. आजचा कार्यक्रम या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज, बुधवारी टाटा मूलभूत विज्ञान संस्थेचे प्रा. संदीप जुनेजा करोनाकाळातील गणितीय अभ्यास या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम सायंकाळी ठीक ६ वाजता 'महाराष्ट्र टाइम्स'च्या https://ift.tt/3lSLcVq या फेसबुक पेजवर पाहता येणार आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fReYpZ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.