Type Here to Get Search Results !

कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये नेमकं चाललंय काय? आणखी एका हत्तीचा मृत्यू

गडचिरोली: महाराष्ट्रातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प म्हणून प्रसिद्ध असलेल्या कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये आणखी एका हत्तीचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे वन विभागाच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सई या तीन वर्षीय हत्तीणीचा मृत्यू झाला असून मृत्यूचे गूढ कायम आहे. जिल्ह्यातील सिरोंचा वन विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या कमलापूर येथील वनपरिक्षेत्रातील शासकीय हत्ती कॅम्पमध्ये एकूण दहा हत्तींचा समावेश होता. मात्र, मागच्या वर्षी २९ जून ला 'आदित्य' नावाच्या चार वर्षीय हत्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या ठिकाणी एकूण ९ हत्ती उरले होते. आज पुन्हा 'सई' नावाच्या हत्तीचा मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा वनविभागाच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. वाचा: ११ जून २०२० रोजी आदित्य नावाचा हत्ती चिखलात अडकला होता. त्याच्यावर वनविभागाने उपचार सुरू केले होते. मात्र २९ जून २०२० ला आदित्य नावाच्या हत्तीचा मृत्यू झाला. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली गेली होती. मात्र, वनविभागाने थातूरमातूर चौकशी करून येथील अधिकार्‍यांची पाठराखण केल्याचे दिसून आले. या ठिकाणी असलेल्या वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आणि हत्तींची देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बेफिकिरीमुळे आदित्य नावाच्या हत्तीचा मृत्यू झाला होता. तब्बल एक वर्षानंतर पुन्हा एका हत्तीचा मृत्यू झाल्याने वन्यप्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. वाचा: सिरोंचा वनविभागाच्या अंतर्गत येत असलेल्या कमलापूर वनपरिक्षेत्रातील शासकीय हत्ती कॅम्प हे राज्यातच नव्हे, तर देशात प्रसिद्ध आहे. दरवर्षी या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ असते. मात्र, दरवर्षी हत्तींचे मृत्यू होत असल्याने वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी वन्यप्रेमींकडून केली जात आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WPSgYD

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.