रत्नागिरी : कोकणात झालेल्या प्रचंड पावसामुळे खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, लांजा, रत्नागिरी आदी भागांना मोठा दणका बसला आहे. गुरुवारची रात्र शेकडो चिपळूणकरांनी भयावह अंधार, सर्वत्र पसरलेला पूर आणि मदतीसाठी आकांत अशा परिस्थितीत काढल्यानंतर, शुक्रवारी आणि आज शनिवारी सकाळपासून बचावकार्याला वेग आला आहे. एनडीआरएफ (National Disaster Response Force) च्या पथकाने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण या पूरग्रस्त भागात बचाव आणि मदतकार्य राबवलं आहे. आता बचावकार्य सुरू असून अनेकांना वाचवण्यात यश आलं आहे. त्यामळे एनडीआरएफच्या पथकाच्या कामाला सलाम आहे. खंरतर, नौसेना, एनडीआरएफ तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील अनुभवी बचाव पथकांनी चिपळूणमध्ये धाव घेऊन अनेक कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या तत्परतेमुळे आज अनेकांचे प्राण बचावले आहेत. इमारतींच्या गच्चीवर, माळ्यावर जीव मुठीत धरून बसलेल्या भयग्रस्त नागरिकांना तब्बल १३ तासांनंतर मदत मिळून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. बचाव करणारे एनडीआरएफचे अधिकारी अगदी देवदूत बननू नागरिकांच्या सेवेत होते. सध्या, चिपळूण तालुक्यातील पूरस्थिती नियंत्रणात आली असून आता हळुहळू पाणी ओसरत असल्याने मदतकार्यास वेग आला आहे. एनडीआरएफची दोन, लष्कराचे एक, नौदलाची दोन, हवाई दलाची दोन पथके तसेच, १५ स्वयंसेवी संस्थामार्फत बोटींच्या साह्याने मदत कार्य युद्धपातळीवर सुरू झाले आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे कामसुरू होते. पुन्हा पुराची भीती? चिपळुणात पाणी ओसरत असले तरी धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे पुन्हा शहरात पूरस्थिती होण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित निवारा स्थळांमध्ये स्थलांतरित व्हावे, असे आवाहन पालकमंत्री अनिल परब यांनी केले. चिपळूण तालुक्यातील दीड हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून भोजन, पाणी व निवासाची व्यवस्था व वैद्यकीय मदत करण्यात आली आहे. काल संपर्क प्रस्थापित न झालेल्या भागातील नागरिकांच्या मदतीसाठी हवाई दल व नौदलाकडून बचाव मोहीम अद्यापही सुरू आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eTAOsa