: मावळ तालुक्यातील कामशेत जवळील कुसगाव खुर्द येथे पाण्याच्या एका खोल डबक्यात दोन लेकरांसह वडिलांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे कुसगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पिराजी गणपती सुळे (वय- ४५), साईनाथ पिराजी सुळे (वय- १४), सचिन पिराजी सुळे (वय-११ तिघेही रा. सध्या इंद्रायणी कॉलनी, कामशेत, मावळ, मूळ रा. नायगाववाडी जि.नांदेड ) अशी बुडून मृत्यू झालेल्या बापलेकांची नावे आहेत. कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रविवारची सुट्टी असल्याने पिराजी हे सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मोठा मुलगा साईनाथ व छोटा मुलगा सचिन या दोघांना घेऊन जवळच असलेल्या कुसगाव खुर्द येथील धबधबे पाहायला गेला होते. धबधब्याच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात उत्खनन केलेल्या जागेत मोठ मोठी डबकी असून ती पाण्याने तुडुंब भरली आहे. या पैकी एका पाण्याच्या डबक्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोन्ही मुले बुडू लागली होती. या दोन्ही मुलांना वाचविण्याचा पिराजी यांनी अतोनात प्रयत्न केला होता. पण अखेर त्यांची दमछाक झाल्याने दोन लेकरांसह त्यांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या डबक्याच्या जवळपास माळावर जनावरांना चाऱ्यासाठी घेऊन आलेल्या एका शेतकऱ्याने त्यांना बुडताना पाहिले आणि आरडाओरड केली. त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून गावकरी घटनास्थळी गोळा झाले. गावकऱ्यांनी त्यांना डबके व त्यातील चिखलाच्या दलदलीतून बाहेर काढले. परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच कामशेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. दरम्यान, पोलिस घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच गावकऱ्यांनी तिघांना बाहेर काढले होते. या घटनेचा पुढील तपास कामशेत पोलिस करत आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3x4nNm7