चिपळूणः केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी आत्ता लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन त्यानंतरच नुकसानभरपाई संदर्भामध्ये जाहीर करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ()यांनी पूरग्रस्तांना दिलं आहे. () चिपळूण, महाड, खेड तालुक्यात महापुरानं थैमान घातलं होतं. अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली तर, व्यापाऱ्यांचं लाखोचं नुकसान झालं. बाजारपेठ परिसरात पुराच्या पाण्यामुळं मोठे नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर असून त्यांनी बाजारपेठेतील पूर परिस्थीतीचा आढावा घेतला. तुम्हाला पायावर उभं करण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दांत यावेळी मुख्यमंत्र्यांनी चिपळूणकरांना धीर दिला आहे. 'काल मी रायगड जिल्ह्यातील तळीये गावात जाऊन पाहणी केली. अंगावर काटा येईल अशी दृश्ये आहेत. हवामान बदल हा शब्द ऐकून होतो, आता त्याचा फटका बसू लागला आहे. पावसाची सुरुवातच चक्रीवादळानं होते. नंतर अचानक कुठेतरी ढगफुटी होते. पूर येतो, जिवीतहानी होते. विध्वंस होतो. हे दरवर्षी होत आहे,' असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. 'केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी आत्ता लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, राज्यातील पूर परिस्थितीचा सर्व आढावा घेऊन त्यानंतरच नुकसानभरपाई संदर्भामध्ये जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसंच केंद्राकडून देखील काय आणि किती मदत मागायची ते ठरवता येईल. मदत करताना तांत्रिक मुद्द्यांवर अडचणी येऊ नयेत या संदर्भातील सूचना देखील मी प्रशासनाला केल्या आहेत,' असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. 'दोन चार दिवसांमध्ये राज्यातील पूरपरिस्थितीतील नुकसानीचा आर्थिक आढावा घेण्यात येईल. मात्र आता लगेच तातडीची मदत म्हणून अन्न, औषध कपडेलत्ते व इतर आवश्यक त्या गोष्टी पूरग्रस्तांना तात्काळ देण्याबाबत सबंधित जिल्हाधिकार्यांना निर्देश दिले आहेत,' असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. केंद्र सरकारकडूनही मदत 'केंद्र सरकारकडून आपल्याला व्यवस्थित मदत मिळत आहे माझे पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री यांच्याशी बोलणं झाले आहे. एनडीआरएफ, लष्कर, हवाई दल यांच्या तुकड्या राज्य सरकारला पूर परिस्थितीत मदत करताहेत,' अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे. पूर व्यवस्थापन करणारी योग्य यंत्रणा कार्यान्वित करणार 'येथील नागरिकांना पाऊस, पूर, पाणी नवीन नाही परंतु या वेळी जे झालं ते अकल्पित होतं आणि पाणी झपाट्याने वाढल्यामुळे त्यांना आपले सामान आणि वस्तूदेखील वाचवता आल्या नाहीत.यापुढे अशा घटना घडू नये म्हणून पूर व्यवस्थापन करणारी योग्य यंत्रणा कार्यान्वित करणार आहोत,' अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. 'वारंवार संकटे येत आहेत हे लक्षात घेऊन या सर्व सबंधित जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येईल. राज्य आपत्ती निवारण दले म्हणजेच एसडीआरएफ आहेत पण ते अधिक सक्षम करू,' असं अश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eUho6G